---Advertisement---

परदेशात तब्बल १.७० कोटी भारतीय

By Saurabh Puranik

Published On:

nri
---Advertisement---

नोकरी असो वा व्यापार, विविध कारणांसाठी अनिवासी बनलेल्या नागरिकांमध्ये भारत अव्वल स्थानी आहे.

तब्बल १ कोटी ७० लाख भारतीय नागरिक सध्या परदेशांमध्ये वास्तव्यास असल्याची महत्त्वपूर्ण माहिती संयुक्त राष्ट्राने (यूएन) मंगळवारी उजेडात आणली आहे. यापैकी ५० टक्के अनिवासी भारतीय हे संयुक्त अरब अमिरातमध्ये स्थायिक झाले आहेत. चालू वर्ष २०१७ साठी अनिवासी नागरिकांसंदर्भात यूएनने आपला विस्तृत अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान व युक्रेनमध्ये अनिवासी नागरिकांची संख्या मोठी आहे. या देशांचे जवळपास ६० लाख ते १ कोटी १० लाख नागरिक विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत.

चालू वर्षात भारताचे तब्बल १ कोटी ७० लाख नागरिक परदेशांत जाऊन स्थायिक झाले आहेत. या घटनाक्रमात मेक्सिको दुसऱ्या स्थानी असून, या देशाचे १.३० कोटी लोक परदेशात राहतात, असे अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ रशियाचे १.१० कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेश व सीरियाचे प्रत्येकी ७० लाख आणि पाकिस्तान तथा युक्रेनचे प्रत्येकी ६० लाख नागरिक स्वत:चा देश सोडून परदेशात गेले आहेत. अहवालानुसार, अनिवासी भारतीयांपैकी सर्वाधिक ३० लाख भारतवंशीय नागरिक संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये वास्तवास आहेत. तर अमेरिका व सौदीमध्ये प्रत्येकी २० लाख भारतीय राहतात. उल्लेखनीय बाब अशी की, जगभरातील जवळपास २५.८० कोटी लोक आपला मूळ देश सोडून परदेशात वास्तव्य करीत असल्याचे प्रस्तुत अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

वर्ष २००० नंतर या आकडेवारीत ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे लक्ष्य यूएनने ठेवले आहे. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय अनिवासी नागरिक मुख्य चिंतेचा विषय असल्याचे यूएनने आपल्या अहवालात म्हटले आहे..

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now