मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातील सर्व नोटा रद्द केल्या आणि त्याजागी दोन हजार आणि पाच हजार रुपयांच्या नव्या चलनी नोटा अर्थव्यवस्थेत दाखल केल्या. मात्र, यातील पाचशे रुपयांच्या नव्या नोटा छापण्यासाठी सरकारला तब्बल पाच हजार कोटी रुपये मोजावे लागले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लेखील उत्तराच्या माध्यमातून सोमवारी लोकसभेत दिली.
सरकारने यंदा ८ डिसेंबरपर्यंत पाचशे रुपयांच्या एकूण १६९५.७ कोटी नव्या नोटांची छपाई केली आहे. या छपाईसाठी सरकारला ४९६८.८४ कोटी रुपये खर्च आला आहे. त्याचवेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयाच्या ३६५.४ कोटी नोटांची छपाई केली असून त्यावर १,२९३.६ कोटी रुपये इतका खर्च आला आहे, असे या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. ५००, २००० प्रमाणे २०० रुपयांच्या १७८ कोटी नव्या नोटांची छपाई करण्यात आली असून त्यावर ५२२.८३ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. ५०, २००, ५०० आणि २००० रुपयाच्या नोटांची ही छपाई नव्या डिझाईननुसार करण्यात आली आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ५०० आणि २००० रुपयांच्या एका नोटेच्या छपाईसाठी अनुक्रमे २.८७ रुपये आणि ३.७७ रुपये इतका खर्च येतो, अशी माहिती सरकारच्या वतीने मार्च महिन्यात देण्यात आली होती.