चीनमध्ये रंगलेल्या मिस वर्ल्ड २०१७ या सौंदर्याच्या जगतातील सर्वोच्च स्पर्धेत मिस इंडिया मनुषी छिल्लरने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीने हा मानाचा मुकूट पटकावला आहे. विश्वसुंदरी स्पर्धेत मिस इंग्लंड स्टेफनी हिल ही दुस-या तर मिस मेक्सिको अॅण्ड्रीया मेझा तिस-या स्थानी राहिली.
यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जगभरातील ११८ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मानुषी हरयाणातील सोनीपत शहरातील रहिवासी आहे. कोणत्या पेशासाठी सर्वाधिक पगार मिळाला पाहिजे आणि तो का मिळाला पाहिजे?, असा प्रश्न मानुषीला अंतिम फेरीत विचारण्यात आला होता. त्यावर ‘आईला सर्वात जास्त सन्मान मिळायला हवा आणि हा सन्मान पैसा वा पगाराच्या रूपात नव्हे तर प्रेम आणि आदराच्या स्वरूपात असावा’, असे मानुषी म्हणाली. मानुषीच्याआधी २०००मध्ये सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड किताब जिंकला होता. त्यानंतर १७ वर्षांनी २० वर्षीय मानुषी छिल्लरने हा किताब पुन्हा भारताकडे खेचून आणला आहे. मानुषी ६७वी मिस वर्ल्ड ठरली. मानुषी मेडिकलची विद्यार्थिनी असून तिला हृदय शल्य चिकित्सक व्हायचे आहे. पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग आणि स्कूबा डायव्हिंगचीही तिला आवड आहे. याशिवाय मानुषी ट्रेंड इंडियन क्लासिकल डान्सर आहे. विश्वसुंदरी होण्याचे स्वप्न मानुषीने बालपणापासून उराशी बाळगले होते आणि आज तिचे हे स्वप्न पूर्ण झाले. १९६६पर्यंत आशियातील एकाही सौंदर्यवतीला मिस वर्ल्ड किताब जिंकता आला नव्हता. १९६६मध्ये भारतीय सौंदर्यवती रीता फारिया विश्वसुंदरी ठरली आणि हा मुकूट प्रथमच आशिया खंडात आला. त्यानंतर ऐश्वर्या रॉय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९) आणि प्रियंका चोप्रा (२०००) यांनी मिस वर्ल्ड कप किताब भारताला जिंकून दिलेले आहेत. मानुषी हा किताब जिंकणारी सहावी भारतीय सौंदर्यवती ठरली.
मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड जिंकणारी सहावी भारतीय सौंदर्यवती

Published On:
