केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २, १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यात राज्यातील १४८ तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार मंत्रालयातर्फे दिल्लीत विज्ञान भवन येथे भारतनेटच्या दुस-या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्ताराविषयी सोमवारी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. भारतनेटअंतर्गत आॅप्टिकल फायबर नेटवर्कवर ब्रॉडबँडचे जाळे निर्माण केले जात आहे. ग्रामस्तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने हा उपक्रम सुरु केला. भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात देशातील एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत.त्यात महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण ७४५१ गावामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क सेवा पोहोचवण्यात आली. तर दुस-या टप्यात राज्यातील १४८ तालुके आणि १ लाख ३८ हजार गावांचा समावेश करण्यात येणार आहे.