बीसीसीआयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेच्या गुंटूर येथील जेकेसी महाविद्यालय मैदानावर झालेल्या लढतीत शुक्रवारी नागालँड संघाचा केवळ २ धावांमध्ये खुर्दा उडाला. केरळविरुद्ध झालेल्या या सामन्यात नागालँडचे तब्बल ९ फलंदाज शून्यावर बाद झाले. नागालँडची खराब कामगिरी कायम राहिली. काही दिवसांपुर्वीची झालेल्या नागालँड – मणिपूर सामन्यात तब्बल १३६ वाइड चेंडूंचा मारा झाला होता.
केरळविरुद्धही नागालँडची सुमार कामगिरी कायम राहिली. सलामीवीर मेनका हिनेच केवळ एक धाव काढण्यात यश मिळवले. बाकी सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले. तसेच, अलीना सुरेंद्रनने एक वाइड चेंडू टाकल्याने नागालँडला दुसरी धाव मिळाली. त्याचवेळी, सौरभ्या पी. (२ बळी), कर्णधार मिन्नू मनी (४), सँड्रा सुरेन (१) आणि बिबी सेबस्टिन (१) यांनी एकही धाव न देता नागालँडला जबर धक्के दिले. लोढा शिफारशीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपल्या मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये पूर्वेकडील सर्व राज्यांना समावेश करावा लागणार आहे. अत्यंत धक्कादायक निकाल लागलेल्या या सामन्याच्या निमित्ताने लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.