मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द केली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नलावडे यांनी हा आदेश सुनावला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या याचिकेवर शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने खोतकर यांची आमदारकी रद्द केली. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत अर्जुन खोतकर यांचा अवघ्या 296 मतांनी विजय झाला होता..
कोण आहेत खोतकर
अर्जुन खोतकर हे जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहे.
सध्याच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री आहेत.
खोतकरांकडे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्यसविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
खोतकर हे चार वेळा (1990, 1995, 2004, 2014) विधानसभेवर निवडून आले आहेत.
1999 मधील शिवसेनेच्या सरकारमध्येही खोतकर यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली होती.