भारताच्या पहिल्या महिला वकील कार्नेलिया साेराबजी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त दि. १५ रोजी गुगलने त्यांचे छायाचित्र ‘डूडल’ करून त्यांना अनाेख्या प्रकारे अभिवादन केले. सोराबजी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ राेेजी नाशिकमधील एका पारशी कुटुंबात झाला. सोराबजी १८९२ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी परदेशात गेल्या. शिक्षण पूर्ण करून १८९४ मध्ये भारतात परतल्या. तत्कालीन कायद्यानुसार महिला वकील म्हणून काम करू शकत नव्हत्या. याविरोधात त्यांनी संघर्ष केला. अनेक महिलांना त्यांनी कायद्याचा माेफत सल्ला देताना महिलांना वकिली पेशाला परवानगीची मागणी केली. त्यांच्या लढाईपुढे सरकार झुकले ब्रिटिश सरकारने १९२४ मध्ये महिलांना वकिलीची परवानगी दिली. त्यांनी सहायक महिला म्हणून बंगाल, बिहार, ओडिसा आसाममधील कोर्टात काम पाहिले. कॉर्नेलिया सोराबजी १९२९ मध्ये हायकोर्टातील वरिष्ठ वकील म्हणून सेवानिवृत्त झाल्या. भारत कॉलिंग ( १९३४) आणि इंडिया रिकॉल (१९३६) ही त्यांनी लिहिलेली दोन आत्मकथने होत. २०१२ मध्ये सोराबजी यांचे नाव लंडनच्या प्रतिष्ठित ‘लिंकन इन’मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्या तत्कालीन बॉम्बे युनिव्हर्सिटीतील पहिल्या पदवीधर महिला, भारत आणि इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करणाऱ्या पहिली भारतीय महिला आहेत.