---Advertisement---

Current Affair 07 November 2018

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

फैजाबाद जिल्ह्याचं नामांतर अयोध्या, योगी आदित्यनाथांची घोषणा

  • योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नामांतर अयोध्या केलं आहे. अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्यासंदर्भात घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यासंबंधी कोणताही उल्लेख योगी आदित्यनाथ यांनी केला नाही.
  • या कार्यक्रमासाठी दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किंवा प्रथम नागरिक किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अजून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असून त्याला राजा दसरथाचं नाव देण्यात येणार आहे. तसंच एक विमानतळ उभारण्यात येणार असून त्याला प्रभू रामाचं नाव देणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.

औष्णिक प्रकल्पांच्या रिकाम्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्रातील सात औष्णिक प्रकल्पांच्या मोकळ्या जागेचा वापर करून सौरऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठीसुमारे एक हजार मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा ऊर्जा विभागाचा विचार आहे.
राज्यात नाशिक, भुसावळ, परळी, पारस, खापरखेडा, कोराडी व चंद्रपूर या सात ठिकाणी कोळशांवर चालणारे औष्णिक वीजप्रकल्प आहेत. त्यांची एकत्रित वीजनिर्मिती क्षमता १० हजार १७० मेगावॉट आहे. याशिवाय महानिर्मितीने १८० मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्पही राबवले आहेत. महाराष्ट्र सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे धोरण ठेवले असून त्यात सौर कृषीपंप, सौरऊर्जेवर चालणारे फीडर अशा विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत.अनेक ठिकाणी महावितरणच्या उपकेंद्रातील मोकळ्या जागांवरही सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

नेमबाज अंगद बाजवा याला ऐतिहासिक सुवर्णपदक

अंगद वीर सिंग बाजवाने आठव्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटातील स्कीट प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय स्कीट नेमबाज ठरला. तसेच भारताच्या ईलाव्हेनिल व्हालारीव्हान आणि हृदय हझारिका जोडीनेही १० मीटर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कनिष्ठ विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. याच प्रकारात मेहुल घोष आणि अर्जुन बबुटा यांनी कांस्यपदक मिळवले.
अंगदने अंतिम फेरीत ६० पैकी ६० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. चीनच्या जी जिन याने ५८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले तर यूएईच्या सईद अल मकतोउम याने ४६ गुणांसह कांस्यपदक पटकावले. अंगदने पात्रता फेरीत १२५ पैकी अन्य तीन नेमबाजांसह प्रत्येकी १२१ गुण प्राप्त केले होते.

अमेरिकेत चुरशीने मतदान

काँग्रेसच्या दोन्ही सभागृह आणि ३६ राज्यांच्या गव्हर्नरपदासाठी होत असलेल्या महत्त्वपूर्ण निवडणुकीतील मतदानाला अमेरिकेत मंगळवारी सुरुवात झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठीचा जनतेचा कौल म्हणूनही या निवडणुकीकडे पाहण्यात येत आहे.
प्रतिनिधीगृहातील सर्व ४३५, सिनेटच्या १०० पैकी ३५, ३६ राज्यांच्या गव्हर्नर या पदांसाठी ही निवडणूक होत आहे; तसेच विविध राज्यांच्या कायदेमंडळांसाठीही मतदान होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्यामुळे, ट्रम्प यांच्या आतापर्यंतच्या धोरणांवरच कौल असल्याचे मानण्यात येत आहे. दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत आहे. राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार, सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम राहील, तर प्रतिनिधीगृहामध्ये विरोधी डेमॉक्रॅटिक पक्षाला विजयासाठी चांगली संधी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now