‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे.या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल. भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून मागील काही महिन्यांपासून हा पुतळा चांगलाच चर्चेत आहे. या पुतळ्याचे एक मराठी कनेक्शनही आहे. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देणार राजीनामा ?
स्वायत्ततेच्या प्रश्नावरून रिझव्र्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान तणाव वाढला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधला होता. २००८ ते २०१४ दरम्यान, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती. बँकिंग व्यवस्थेतील आजच्या बुडीत कर्जाच्या समस्येचेही खापरही त्यांनी रिझव्र्ह बँकेवर फोडले होते.
तर त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात सरकारवर टीका केली होती. यावरुन आरबीआय आणि केंद्र सरकारमधील संबंधात तणाव असल्याचे दिसते.मात्र, अद्याप रिझर्व्ह बँकेच्या वतीने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमरिकेचं नागरिकत्व हा जन्मसिद्ध हक्क नाही – ट्रम्प यांचा प्रस्ताव
अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरीत नागरिकांविरोधातील आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तसेच अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांच्या मुलांना जन्मानंतर मिळणाऱ्या घटनात्मक नागरिकत्वाच्या अधिकारावर लवकरच गदा येऊ शकते. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांच्या किंवा बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांच्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाल्यास या मुलांना जन्मत: अमेरिकन नागरिकत्व मिळते.
व्हाइट हाऊसचे वकिल या संदर्भात काम करत आहेत, लवकरच एक अध्यादेश निघेल आणि अमेरिकन नसलेल्यांच्या मुलांना मिळणारं अमेरिकेचं नागरिकत्व मिळणं बंद होईल असे त्यांनी सांगितले. अमेरिकी घटनेच्या 14व्या घटनादुरूस्तीनुसार, अमेरिकेमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला अमेरिकेच्या व त्या राज्याच्या कक्षेत असलेले सगळे अमेरिकेच्या नागरिकाचे अधिकार मिळतील. आता, डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भूमिका खरोखर अमलात आणली तर अक्षरश: लाखोजणांवर याचा परिणाम होऊ शकतो.
छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी अशोक मोडक यांची नियुक्ती:
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय विश्वविद्यालय छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी डॉ. अशोक मोडक यांची नियुक्ती केली आहे.
शिक्षण क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनासाठी डॉ. मोडक हे परिचित आहेत. ते मूळचे डोंबिवलीकर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे डोंबिवलीतील व्यक्तीला कुलाधिपतीचा मान मिळाल्याने मानाचा तुरा डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला गेला आहे.
डॉ. मोडक यांनी 1963 पासून प्राध्यापक म्हणून काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत.
सन 1994 ते 2006 पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार होते. या कारकिर्दीत त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राज्य सरकारने दिला होता.
प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका सरकार दरबारी व विधिमंडळात मांडली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होणार आहे.