चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर
भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडर संपर्काबाहेर गेलं. चंद्रयान 2 मोहिमेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अखेरच्या 15 मिनिटांत ‘इस्रो’ आणि ‘विक्रम’ लँडर यांचा संपर्क तुटला. आता सर्व मदार चंद्राच्या कक्षेत असलेल्या ‘चंद्रयान 2’च्या ऑर्बिटरवर आहे.‘चंद्रयान 2’ सात सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होतं. 30 किलोमीटर अंतरावर स्थिरावलेल्या लँडरने चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क तुटला.‘चंद्रयान 2’चा ऑर्बिटर 100 किलोमीटर अंतरावर असून आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राभोवती फेऱ्या घालून ऑर्बिटरही बरीचशी माहिती गोळा करणार आहे.
झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन
झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. १९८० ते २०१७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशाला आपल्या वज्रमुठीत दडपून ठेवले होते.
श्वेतवर्णीय अल्पसंख्याकांच्या राजवटीतून ऱ्होडेशियाला मुक्त करणारा नेता अशी त्यांची ओळख होती पण नंतर त्यांनी स्वत: सत्ता राबवताना दडपशाही व भीती पेरण्याचे राजकारण केले. नंतर त्यांच्याच एकनिष्ठ लष्करशहांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली होती.
नोव्हेंबर २०१७ मध्ये मुगाबे यांना अपमानास्पद पद्धतीने सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. पण नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. सिंगापूर येथे काही महिने त्यांना अज्ञात आजारामुळे रुग्णालयात ठेवण्यात आले होते पण बहुदा त्यांना पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग होता.
बजरंगला अव्वल मानांकन
भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया याला १४ सप्टेंबरपासून कझाकस्तान येथील नूर-सुलतान येथे रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ६५ किलो वजनी गटात अव्वल मानांकन मिळाले आहे. या स्पर्धेद्वारे टोक्यो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय कुस्तीपटू सज्ज झाले आहेत.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला बजरंग सध्या रशिया येथे सराव करत असून गेल्या वेळी त्याने रौप्य तर २०१३मध्ये कांस्यपदकासाठी कमाई केली होती.
२०१०मध्ये भारताला एकमेव जागतिक सुवर्णपदक मिळवून देणारा सुशील कुमार या स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याला ६१ किलो गटात दुसरे मानांकन मिळाले आहे. ८६ किलो गटात कनिष्ठ गटातील जागतिक विजेता दीपक पुनिया याला चौथे मानांकन देण्यात आले आहे.







