⁠  ⁠

चालू घडामोडी : १ नोव्हेंबर २०१९

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 1 November 2019

काश्मीरवरून भारताने चीनला फटकारले

देशांतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला

– जम्मू-काश्मीरची पुनर्रचना हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून, चीनने त्यात हस्तक्षेप करू नये, अशा शब्दांत भारताने  गुरुवारी चीनला फटकारले.

– जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या पाश्र्चभूमीवर गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताने देशांतर्गत कायदा आणि प्रशासकीय विभागात एकतर्फी बदल करून चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचे गेंग शुआंग यांनी म्हटले होते.

देशात आता २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासीत प्रदेश

map-of-india-after-bifurcation-of-jammu-and-kashmir

– जम्मू आणि काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासीत प्रदेश आजपासून अस्तित्वात आल्याने देशात आता २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासीत प्रदेश झाले आहेत.

केंद्रशासीत प्रदेश कोणते ?

– १) अंदमान आणि निकोबार २) चंदिगड ३) दादरा आणि नगर हवेली ४) दमण आणि दिव ५) राजधानी दिल्ली ६) लक्षद्विप ७) पुण्डेचरी ८) जम्मू आणि काश्मीर ९) लडाख.

केंद्रशासीत प्रदेशांचे वेगळेपण काय ?

– केंद्रशासीत प्रदेशांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. केंद्रशासीत प्रदेशांना निधी केंद्राकडून दिला जातो. कोणत्या केंद्रशासीत प्रदेशांना किती निधी द्यायचा हा निर्णय हा केंद्र सरकारचा असतो. भारताच्या राष्ट्रपतींकडून नायब राज्यपालांची नियुक्ती केली जाते. केंद्र सरकारकडून राज्यांना किती निधी द्यायचा याची शिफारस वित्त आयोगाकडून केली जाते. यानुसार केंद्र सरकार निर्णय घेतो. केंद्रशासीत राज्यांबाबत मात्र असे कोणतेही सूत्र ठरलेले नसते.

किती केंद्रशासीत राज्यांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे?

– दिल्ली आणि  पुण्डेचरी या राज्यांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे. आज नव्याने अस्तित्वात आलेल्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासीत प्रदेशातही विधानसभा अस्तित्वात येणार आहे.  अन्य सहा केंद्रशासीत प्रदेशांमध्ये मात्र स्वतंत्र विधानसभा अस्तित्वात नाही. दोन्ही राज्यांमध्ये नायब राज्यपालांनी लोकनियुक्त सरकारच्या सल्ल्याने काम करण्याची तरतूद नाही. याउलट कोणत्याही निर्णयासाठी मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाला नायब राज्यपालांकडे पाठपुरावा करावा लागतो. यावरूनच वाद होतात.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा नवी दिल्लीत पार पडली

isa logo
आंतरराष्ट्रीय सौर युती International Solar Alliance Logo

– 30 आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा भरविण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले.

– भारताचे अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग आणि फ्रान्सचे ब्रूने पिर्सन कार्यक्रमाचे सह-अध्यक्ष होते. सभेला 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झालेत. ही सभा ‘ISA’ची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे आणि विविध प्रशासकीय, आर्थिक आणि कार्यक्रमांशी संबंधित मुद्द्यांविषयी मार्गदर्शन पुरविते.

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन

girija kir
गिरिजा कीर

कथा, कांदबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाचे काम

– ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे आज (गुरूवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि सूना असा परिवार आहे.  त्यांच्यानावावर १०० पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. याशिवाय त्यांनी कथा,कांदबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाचे काम केले आहे.

– साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री  साहित्यिका पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

– किर्लोस्कर, प्रपंच, ललना इत्यादी मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी विविध वाङ्मयप्रकारांत लेखन देखील केले आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले होते. गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला इ. गिरिजाबाईंच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Share This Article