चालू घडामोडी : ११ नोव्हेंबर २०१९
Current Affairs 11 November 2019
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन
– निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
– मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची १२ डिसेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली. आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करून त्यांनी राजकारण्यांमध्ये निवडणूक आयोगाचा धाक निर्माण केला. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सुधारण घडवून आणल्या. त्यांच्या आधी त्यांच्याएवढे धाडस क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले असेल. ते निवृत्त झाल्यानंतर आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचा कित्ता गिरवला. निवडणूक आयोग ही लोकशाहीतील महत्त्वाची स्वायत्त संस्था असून ती राजकीय हस्तक्षेपापलिकडे असते, याची जाणीव शेषन यांच्या कार्यपद्धतीमुळेच नागरिकांना प्रथमच प्रकर्षांने झाली.
हितेश देव सरमा
आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे नवे समन्वयक
– आसाम राज्यात चाललेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे नवीन समन्वयक म्हणून हितेश देव सरमा ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हितेश देव सरमा सन 1986च्या तुकडीतले आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी आहेत.
– राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) यामध्ये देशातल्या अधिकृत नागरिकांची नोंद होते. ज्या नागरिकांचे नाव NRCमध्ये नसते त्याना अवैध मानले जाते. NRCनुसार 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतीय मानले जात आहे.
‘IndAIR’: हवेची गुणवत्ता यासंदर्भातले देशाचे पहिले
परस्परसंवादी ऑनलाइन व्यासपीठ
– वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI) या संस्थेनी ‘IndAIR’ (इंडियन एयर क्वालिटी इंटरएक्टिव रिपॉझिटरी) या नावाने हवेची गुणवत्ता याच्या संदर्भातले देशाचे पहिले परस्परसंवादी ऑनलाइन व्यासपीठ (भांडार) विकसित केले आहे.
– भारतातली हवेची गुणवत्ता या विषयात अभ्यास करण्यासाठी आणि संशोधनांसाठी माहिती सहज उपलब्ध व्हावी हे उद्दीष्ट ठेवून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
मूडीज्चा देशाच्या अर्थव्यवस्थेविषयक दृष्टिकोन नकारात्मक
– कमकुवत आर्थिक स्थितीवर सरकारने योग्य उपाय केले नाहीत; यातून भविष्यात विकास दर आणखी घटेल अशी जोखीम उपस्थित करीत मूडीजने भारताचा गुतवणूकविषयक दृष्टिकोन खाली खेचत नकारात्मक केला आहे. अमेरिकी पतमानांकन संस्थेने देशाचे सध्याचे पतमानांकन ‘स्थिर’वरून ‘नकारात्मक’ करण्याचाही इशारा दिला आहे. भारताचा गुंतवणूकविषयक दर्जा कमी करण्यात गेल्याने आधीच संकटात असलेल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी मंदावण्याची भीती निर्माण झाली आहे. फिच आणि एस अँड पी या अन्य आघाडीच्या पतमानांकन संस्थांचाही भारताच्या गुंतवणूकविषयक दर्जा ‘स्थिर’ असाच कायम आहे.
– दरम्यान, मूडीच्या दर्जा बदलाच्या अंदाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.
– मूडीजने परकीय चलन पतमानांकन स्थिर ठेवण्याबाबत दिलासा देतानाच चालू वित्त वर्षअखेर वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात ३.७ टक्क्यांपर्यंत विस्तारेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.