1) 65th National film Awards : ‘कच्चा लिंबू’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, श्रीदेवी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
65 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फर्नस येथून करण्यात आली. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकले होते. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.’म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. नागराज मंजुळेंच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. कमाईत कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेल्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अॅक्शन आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेत्री दिव्या दत्ताला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
मराठी चित्रपट
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – मोरक्या (मराठी चित्रपट)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
बॉलिवूडमधील पुरस्कार :
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)
२) ग्राहकास 760 कोटींच्या भरपाईचे जॉन्सन अँड जॉन्सनला आदेश
बेबी केअर बाजारपेठेत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सनला पुन्हा एकदा मोठा झटका बसला. एका अमेरिकी न्यायालयाने या कंपनीस ग्राहकाला ७६० कोटींची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने २४० कोटींची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ न्यायालयाने ही भरपाई तिप्पट वाढवली. न्यूजर्सीतील ४६ वर्षीय बँकर स्टीफन लँजो व पत्नी कँड्रा यांनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरने मेसोथेलियोमा झाल्याचा दावा करून भरपाई मागितली होती.
गेल्या २ वर्षांत जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रकरणात ७ मोठे निकाल आले. यात कोर्टाने कंपनीला सुमारे ५,९५० कोटींचा दंड ठोठावला. तथापि, २,७०० कोटींच्या एका प्रकरणात निकाल कंपनीच्या बाजूने लागला. ऑगस्टमध्ये अलाबामाच्या एका महिलेला गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणात ४७५ कोटींची भरपाई द्यावी लागली. यानंतर मिसुरीच्या ५ प्रकरणांत कोर्टाने १,९९६ कोटींचा दंड ठोठावला होता.
३) युरोपियन अंतराळ संस्थेने लावला दुसऱ्या चुंबकीय क्षेत्राचा शोध
सूर्यातून निघणाऱ्या घातक किरणोत्सर्गापासून सजीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीभोवती एक चुंबकीय आवरण असल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र शास्त्रज्ञांनी अशाच प्रकारच्या अजून एका चुंबकीय आवरणाचा शोध लावला आहे.
या दुसऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासासाठी युरोपियन अंतराळ संस्था ईएसएने स्वार्म नावाने एक मोहीम हाती घेतली होती. ईएसएचे तीन उपग्रह गेली चार वर्षे या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करून त्याची उत्पत्ती आणि कार्य समजून घेत होते. नुकत्याच ऑ्ट्रिरयाच्या व्हिएन्नामध्ये झालेल्या युरोपीयन जिओसायन्स युनियन अर्थात भूशास्त्र परिषदेच्या बैठकीत ईएसएने याबाबतचा अहवाल सादर केला. महासागरांच्या लाटांपासून या दुसऱ्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती झाली असून पृथ्वीला घातक सौरवादळांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम ते करत असते.अतिनील किरणांमुळे पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर नष्ट होऊन अतिउष्ण सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पोहचेल. यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होऊन सजीवसृष्टी अस्तित्वच धोक्यात येईल. मात्र चुंबकीय क्षेत्रामुळे या सौरवादळांपासून पृथ्वीचे रक्षण होते. पृथ्वीच्या गर्भातील तप्त लाव्हारसामुळे या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आता त्याच्या जोडीला सागरी लाटांमुळे निर्माण झालेल्या दुसऱ्या चुंबकीय क्षेत्राचाही शोध लागला आहे.