Current Affairs 20 November 2019
पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा पुर्ववत; पार्सल सेवा मात्र बंदच
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने टोकाचे पाऊल उचलत भारतासोबतची टपाल सेवा अचानक बंद केली होती. यावर आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारताने केला होता. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानकडून पुन्हा ही टपाल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, पार्सल सेवा अद्यापही बंदच आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ऑक्टोबर महिन्यांत दिली होती. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही गोष्ट घडली होती. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला होता.
यापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये तीन वेळेस युद्ध झाले मात्र त्या काळातही पाकिस्तानने कधी भारताची टपाल सेवा खंडीत केली नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतासोबतची टपाल सेवा बंद करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते.
राज्य सभेत महाराष्ट्राचे १९ खासदार
राज्यसभेचे एकूण सदस्य किती?
राज्यसभेची सदस्यसंख्या सध्या २४५ आहे. पण ही संख्या २५० पर्यंत जाऊ शकते.
महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृहातील प्रतिनिधित्व किती?
राज्यसभेत महाराष्ट्राचे एकूण १९ खासदार निवडून येतात.
दर दोन वर्षांनी राज्यातील किती सदस्य निवृत्त होतात?
लागोपाठ दोनदा दर दोन वर्षांनी सहा सदस्य निवृत्त होतात. तिसऱ्या वर्षी सात सदस्य निवृत्त होतात. पुढील वर्षांच्या सुरुवातीला सात सदस्य निवृत्त होतील.
अन्य राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व किती?
उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ३१ सदस्य राज्यसभेवर निवडून येतात. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातून १९ सदस्य वरिष्ठ सभागृहात निवडून येतात. तमिळनाडू (१८), बिहार (१६), पश्चिम बंगाल (१६), आंध्र प्रदेश (११).
राज्यातून सध्या राज्यसभेवर कोण सदस्य आहेत?
पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले आणि व्ही. मुरलीधरन हे राज्यातील चार राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्य आहेत.
शरद पवार, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे, वंदना चव्हाण, हुसेन दलवाई आदी सदस्य आहेत.
राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची आवश्यकता असते?
राज्यातून राज्यसभेवर निवडून जाण्याकरिता सरासरी ४२ मतांची आवश्यकता असते.
किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याच्या वार्षिक बैठकीचे नवी दिल्लीत आयोजन
हिर्यांच्या उद्योगांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेली जागतिक संघटना ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) याची वर्षातली शेवटची बैठक 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2019 या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
भारत ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि सन 2019 साठी ‘किंबर्ली प्रोसेस’ याचा अध्यक्ष आहे. भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव बी. बी. स्वाइन हे “KP चेअर” तर वाणिज्य विभागाचे आर्थिक सल्लागार रूपा दत्ता या “KP फोकल पॉईंट” आहेत.
22 नोव्हेंबर 2019 रोजी बैठकीच्या शेवटी भारत KPचे अध्यक्षपद रशियाकडे सोपविणार आहे.