1) अण्वस्त्रवाहू अग्नी 2 ची चाचणी यशस्वी, दोन हजार किमी पल्ल्याची क्षमता
भारतानं आज अग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मंगळवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली आहे. इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाइल लाँचरच्या माध्यमातून अग्नी 2 ची चाचणी घेण्यात आली.
अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे. भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे. या सीरीजमध्ये अग्नी 1 (700 किमीचा पल्ला), अग्नी 3 (3000 किमीचा पल्ला), अग्नी 4 (4000 किमीचा पल्ला) व अग्नी 5 (5000 किमीपेक्षा जाल्त पल्ला) यांचा समावेश आहे.
2) राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारताच्या बॅडमिंटन संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या बॅडमिंटन संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. ४ ते १५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची मदार सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ पुढीलप्रमाणे असेल –
पुरुष संघ : किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, चिराग शेट्टी, सत्विक साईराज, प्रणव जेरी चोप्रा
महिला संघ : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आश्विनी पोनाप्पा, सिकी रेड्डी, शिवानी गड्डे
3) आयसीसी वन-डे क्रमवारीत विराटने ओलांडला ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिवसेंदिवस नवनवीन विक्रम आपल्या नावावर करण्याचा सपाटा चालु ठेवला आहे. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गेल्या २७ वर्षांमध्ये कोणत्याही खेळाडूला ही किमया साधता आली नव्हती. कोहली सध्या ९०९ गुणांसह वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
विराट कोहलीच्या आधी सर विव्हीअन रिचर्ड, झहीर अब्बास, ग्रेग चॅपल, डेव्हीड गोवर, डीन जोन्स आणि जावेद मियादाद यांनी आपल्या कारकिर्दीत ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत विराटने ५५८ धावांची लयलूट केली होती. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये ९०० किंवा त्यापेक्षा जास्त रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा दुसरा खेळाडू ठरला आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.