⁠  ⁠

Current Affairs – 28-29 September 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

  • व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने गुरुवारी या याचिकेवर निर्णय दिला. न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता. सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे आयपीसीतील कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय दिला. व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

मशीद इस्लामचा अविभाज्य घटक प्रकरणी मोठ्या घटनापीठाची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

  • मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निर्णय दिला. प्रत्येक निर्णय त्या परिस्थितीरूप घेतलेला असतो असे कोर्टानं स्पष्ट केलं. मशिद हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे का यावर १९९४ साली निकाल देताना फारूखी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं, मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचे स्पष्ट केले होते आणि सरकारनं मशीद ताब्यात घेणं घटनाविरोधी नसल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचेही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
  • या निकालामुळे बाबरी मशीदीप्रकरणी फारूखी प्रकरणाचा प्रभाव पडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. बाबरी मशीदीचानिकाल जागेची मालकी कुणाकडे यावरच ठरेल असे संकेत त्यामुळे मिळाले आहेत. बाबरी मशीदीची जागा कुणाची हे अत्यंत वादग्रस्त प्रकरण सुप्रीम कोर्टापुढे प्रलंबित आहे.
  • याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निर्णय दिल्यानंतर अयोध्या वादावरील सुनावणीला गती मिळणार आहे. या प्रकरणाची २९ ऑक्टोबरपासून सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी सुरू होणार असून जमिनीचा वाद म्हणूनच या खटल्याचा निर्णय दिला जाणार आहे.

सातारा देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा! पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार गौरव

  • स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ (ग्रामीण) मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे.
  • सातारा जिल्हा परिषदेने यापूर्वी शौचालय बांधून हागणदारीमुक्‍त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळवला होता.

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन

  • प्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचे निधन झाले आहे. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या.
  • महाजन यांना २००८ सालचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. तसेच कवयित्री बहिणाई पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना २०११ मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार देण्यात आला होता.

Share This Article