केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या (UPSC) स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना फार आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे हजारो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी जीव तोडून कष्ट घेतात. मात्र कोरोना महामारीच्या काळात अनेकदा लॉकडाउन करण्यात आल्यामुळे दुसऱ्या शहरात राहून यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परतावं लागलं होतं. याशिवाय, कोविडच्या काळत मानसिकता ठीक नसल्यामुळे अनेकांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आलं नाही. याच काळात अनेकांनी वयाची मर्यादाही पार केली.
त्यामुळे आता त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्रीय लोकसेवा आयोगानं यूपीएससी सीएसई परीक्षांसाठी आणखी एक संधी दिली पाहिजे, असं इच्छुक विद्यार्थ्यांचं मत आहे. त्यासाठी ट्विटरवर #UPSCExtraAttempt2023 हा ट्रेंडही चालवण्यात आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अतिरिक्त संधीची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी 19 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचं नियोजन केलं आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करण्याचा विचारही ते करत आहेत.
यापूर्वी, मार्च महिन्याच्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयानं सरकारला आपला विचार बदलण्याची आणि सीएसई इच्छुकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची शिफारस केली होती. सर्व उमेदवारांना संबंधित वयोमर्यादेत सवलत देऊन अतिरिक्त संधी दिली जावी, असं न्यायालयानं म्हटलं होतं.
2021मध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी हजारो इच्छुक परीक्षा केंद्रांवर जमले होते. त्या वेळी कोविड -19 निर्बंध अस्तित्वात होते. तरीही परीक्षा घेण्यात आली. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. शिवाय, कोविड-पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नव्हता. त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती, याकडे या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं आहे.