पश्चिम खोऱ्यातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यास मान्यता देण्याबरोबर गोदावरी खोऱ्यातील एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली. हा देशातील पहिलाच जल आराखडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्रातील जल आराखड्याचे काम पूर्ण झाले अाहे. कृष्णा, तापी, कोकण खोऱ्यातील आराखड्यास मार्चपर्यंत मान्यता देण्यात येईल. महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणांच्या सूचनांनुसार राज्यातील जल आराखडा तयार होणे प्रस्तावित होते. त्यानुसार राज्यातील पाच खोऱ्यांतील जल आराखडे तयार करून एकत्रित करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी एकात्मिक राज्य जल आराखड्यांतर्गत गोदावरी खोरे जल आराखड्यास मान्यता देण्यात आली.