कष्टाचे फळ; महेशने केल्या एकाचवेळी तीन सरकारी नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण
आपल्या जीवनाची दिशा व वाटचाल ही सकारात्मक विचार करून ठरवली तर यशाच्या शिखरावर चढता येते. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष आणि अभ्यास हा चालू ठेवला पाहिजे. महेश कृष्णा पगार यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले आहे.
महेशच्या घरची परिस्थिती ही शेतकरी कुटुंबातील असून त्याचे वडील प्रगत शेतकरी आहेत. मुलाने मोठे व्हावे आणि नाव कमवावे ही त्यांची इच्छा. त्यामुळे, त्यांनी मुलाला शिक्षणासाठी नेहमी पाठिंबा दिला.प्राथमिक शिक्षण शासकीय जि. प. मराठी शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आर. के एम विद्यालयात झाले.
बारावीनंतर चांगले गुण असल्याने त्यांच्यासमोर भरपूर पर्याय होते. मात्र, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असल्याकारणाने त्यांनी बी. टेक. ( कृषी अभियांत्रिकी ) करण्याचा निर्णय घेतला व कोल्हापूर जिल्ह्यातील डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी ८०% सह शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच चांगल्या पगाराची नोकरी मिळत असताना देखील त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला.
दिवस-रात्र अभ्यास करून सर्वप्रथम वनरक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम. तलाठी (नाशिक ), विस्तार अधिकारी (जि. प. पालघर) पदावर निवड झाली. दरम्यानच्या काळात त्यांनी एम. ए. मराठी, एम. ए. अर्थशास्त्र तसेच दोन्ही विषयांमध्ये सेट नेट देखील उत्तीर्ण केले. मानूर येथील कला वाणिज्य व विज्ञान विद्यालयामध्ये मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतानाच त्यांनी विविध परीक्षांचा अभ्यास केला. सातत्याने अभ्यास केल्यामुळे त्याच्या या कष्टाचे फळ मिळाले. सध्या ते विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर जिल्हा परिषद येथे रुजू झाले आहेत.