भारत जगातील सर्वाधिक संपत्ती राखणारा आठवा सर्वात मोठा देश
भारताची संपत्ती ४५१ अब्ज डॉलरवर गेल्यामुळे भारत हा जगातील सर्वाधिक संपत्ती राखणारा आठवा सर्वात मोठा देश ठरला आहे. देशाच्या एकूण संपत्तीचे मोजमाप केल्यास ती सुमारे पाच लाख कोटी डॉलर इतकी झाली आहे. देशात एकूण दोन लाख ४५ हजार दशलक्षाधीश आहेत असेही क्रेडिट सूस संस्थेच्या एका ताज्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. यागतीने भारतातील संपत्ती वाढत गेल्यास २०२२पर्यंत अतिश्रीमंतांची संख्या तीन लाख ७२ हजारावर जाईल, असा अंदाज क्रेडिट सूसने आपल्या अहवालात दिला आहे. त्याचप्रमाणे त्यावेळी देशाची एकूण संपत्ती वार्षिक ७.५ टक्के दराने वाढत ७.१ लाख कोटी डॉलरवर जाईल. २०००पासून देशातील संपत्ती सातत्याने वार्षिक ९.९ टक्के दराने वाढली आहे. जगातील सर्व देशांत संपत्तीत वाढ सरासरी सहा टक्के दराने झाली आहे. त्याचवेळी जगाची लोकसंख्या वार्षिक २.२ टक्के दराने वाढली आहे. दरडोई संपत्तीचे मोजमाप केल्यास ९२ टक्के प्रौढ लोकसंख्येकडे १० हजार डॉलरपेक्षाही कमी संपत्ती असल्याचे आढळले आहे. केवळ ०.५ टक्के प्रौढांकडेच एक लाख डॉलरहून अधिक नेटवर्थ आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे असे नेटवर्थ असणाऱ्यांची संख्ये ४२ लाख आहे. जगात सर्वाधिक श्रीमंत देश असण्याचा मान स्वित्झर्लंडला मिळाला आहे. या देशाची संपत्ती दरडोई पाच लाख ३७ हजार ६०० डॉलर इतकी आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (चार लाख दोन हजार ६०० डॉलर) तर अमेरिका (तीन लाख ८८ हजार डॉलर) या देशांचे क्रमांक लागले आहेत.