भारतामध्ये आजचा दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता.
या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशची निर्मिती झाली. भारतीय सैन्याने फक्त 13 दिवसात पाकिस्तानला लोळवून इतिहास रचला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी यांनी ढाक्याच्या रेसकोर्स मैदानावर आपल्या 93 हजार सैनिकांसोबत, भारतीय सैन्याचे कमांडर जनरल जगजीत सिंहअरोरा यांच्यासमोर शरणागती पत्कारली होती. दोन्ही देशांमधील इतिहासातील हे सर्वात छोटे युद्ध ठरले. 90 ते 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने कैद केले होते. या युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दहा हजार सैनिक जखमी झाले होते. याचीच आठवण म्हणून आज देशभर विजय दिवस साजरा केला जातो. विजय दिवसाला दिल्लीतल्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीला सलामी देत युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाला आज 46 वर्ष पुर्ण होत आहेत.