इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँक – टपाल जाळ्याद्वारे वित्तीय सेवा
६५० शाखा आणि ३२५० संपर्क केंद्रांद्वारे नवी बँक कार्यान्वित
६५० शाखा आणि ३२५० संपर्क केंद्रांद्वारे नवी बँक कार्यान्वित
- देशातील टपाल जाळ्याला बळकटी देणाऱ्या आणि या टपाल जाळ्याचा वापर करून सर्वसामान्यांच्या दारात वित्तीय सेवा पोहोचवत बचतीला चालना देणाऱ्या ‘इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँके’चे (आयपीपीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ शनिवार रोजी उद्घाटन केले.
- या बँकेची स्थापना १७ ऑगस्ट २०१६ रोजीच झाली होती. ३० जानेवारी २०१७ रोजी प्रायोगिक तत्त्वावर या बँकेच्या रायपूर आणि रांची येथील दोन शाखांचे उद्घाटनही झाले होते. त्यामुळे याआधीच प्रत्यक्षात आलेली ही योजना आता देशाच्या सर्व जिल्ह्यात पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी कार्यान्वित झाली आहे.
- टपाल कार्यालयांचे जाळे आणि जवळपास तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या दारात बँकिंग सेवा त्याद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. अर्थात दारपोच सेवेसाठी शुल्क आकारले जाईल आणि जीएसटीही आकारला जाईल, असे या बँकेच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
- दळणवळणमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, ६५० शाखा आणि ३२५० संपर्ककेंद्रांद्वारे आयपीपीबीची सेवा देशभर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्याही खात्यामध्ये एक लाख रुपयांहून अधिक रक्कम भरल्यास त्याचे आपोआप टपाल कार्यालय बचत खात्यामध्ये रूपांतर होणार आहे.
अर्थकारणाला चालना
संपूर्ण सरकारी मालकीच्या या बँकेची सेवा ६५० शाखांमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र देशातील सर्व एक लाख ५५ हजार टपाल कार्यालयांत या बँकेची सेवा उपलब्ध होण्यास डिसेंबर २०१८पर्यंतचा अवधी लागणार आहे. यातील एक लाख ३० हजार शाखा या ग्रामीण भागांत आहेत. देशातील टपाल कार्यालयांची ही संख्या देशातील बँक जाळ्याच्या अडीचपट असल्याने ही बँक म्हणजे नागरी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे.
टपाल बँकेची वैशिष्ट्ये
- आयपीपीबी १०० टक्के सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यारित स्थापन.
- एअरटेल आणि पेटीएमनंतर ‘पेमेन्ट बँक’ म्हणून परवाना लाभलेली तिसरी सेवा.
- तब्बल १०० हून अधिक देयकांचा भरणा आणि आर्थिक व्यवहार पार पाडण्याची सोय.
- बचत आणि चालू खात्यांची सेवा उपलब्ध.
- निधी हस्तांतरण, लाभार्थी अनुदान हस्तांतरण, गॅस, दूरध्वनी, वीज आदी देयकांचा भरणा, सेवामूल्यांचा भरणा, एटीएम आणि डेबिट कार्ड, नेटबँकिंग आदी सेवा उपलब्ध.
- खाते उघडण्यासाठी आधारचा वापर, तर वैधता, व्यवहार आणि पैसे भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर.
- खात्यात किमान ठेवीची अट नाही.
- कमाल ठेवीची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच.
- त्यापुढील ठेवी या थेट टपाल कार्यालय बचत खात्यांत जमा होणार.
- बचत खात्यावर चार टक्के व्याजदर.
- मायक्रो एटीएम, मोबाइल बँकिंग अॅप, संदेश आदींद्वारे सेवा.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel