इंदोरच्या सुयश दीक्षित या तरुणाने आफ्रिकेतील एका भूमीवर स्वतःचे राज्य स्थापन करुन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करुन टाकलंय. त्याने तेथे स्वतःच्या राज्याचा झेंडा तर रोवलाच तर त्या राज्याला ‘किंग्डम ऑफ दीक्षित’ म्हणजे ‘दीक्षितांचं राज्य’ असं नावच देऊन टाकलं आहे.
बीर ताविल नावाचा एक भूभाग गेली अनेक वर्षे सुदान आणि इजिप्त यांच्यामध्ये आहे. दोन्ही देशांनी दोन वेगवेगळ्या सीमांना प्रमाण मानल्यामुळे हा ८०० चौ मैलांचा भाग तसाच राहिला. दोन्हीही देशांनी हा भाग आपला नसल्याचे सांगून त्यावर स्वामित्त्व हक्क सांगितला नाही. बीर ताविलवर कोणीही राहात नाही कारण ते पूर्णतः वाळंवट आहे. सुयशने इजिप्तमार्गे तेथे प्रवेश केला आणि त्या प्रदेशाचा तो राजा बनला आहे. सुयशने आपल्या वडिलांकडे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख ही पदे सोपवली आहेत. तेथे त्याला वाळंवटात जगणारी पाल हा एकमेव प्राणी दिसल्याने त्या पालीला सुयशने राष्ट्रीय पशू जाहीर केले आहे. त्याच्या राज्यात जातपात नसेल आणि भारतीय चलन चालेल असं स्पष्ट करत त्याने किंग्डम ऑफ दीक्षित नावाने संकेतस्थळ काढून नव्या नागरिकत्वासाठी लोकांना अर्ज करण्यास सांगितले आहे.
आता राजा व्हायचं तर तिथल्या मातीवर शेतीद्वारे तुमचा हक्क असला पाहिजे , मग या पठ्ठ्याने तेथे दोन बिया खोचून, बाटलीतले पाणी देऊन आपण येथे शेती करत असल्याचेही जाहीर करुन टाकले.