4 डिसेंबर रोजी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
160 चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
या चित्रपटांमध्ये केले शशी कपूर यांनी काम
शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. 1948 साली आलेल्या ‘आग’ आणि 1951 साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. 1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘जब जब फूल खिले’ या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत.
जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं. शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले.