⁠  ⁠

MPSC Update : महाराष्ट्र राज्य आयोगाअंतर्गत येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये मोठे बदल !

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

MPSC Gazetted and Non-Gazetted Combine Prelims

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा व अराजपत्रित गट-ब आणि गट क अशा सर्वच परीक्षांमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत संकेतस्थळाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोगाने नवीन बदलांबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. याआधी मागच्या महिन्यातच आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असेल व यात सामान्य अध्ययनाच्या सोबत वैकल्पिक विषयाचा ही आता मुख्य परीक्षेत समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

आज आलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता काही महत्त्वाचे बदल हे परीक्षेच्या पद्धतींमध्ये करण्यात आले आहेत.

१. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा : (MPSC Gazetted Combine Prelims)
– स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसंच राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी ‘एकच प्रिलिम्स परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र मेन्स परीक्षा स्वतंत्र पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत.

– राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

– महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा इत्यादी) निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

२. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : (MPSC Non-Gazetted Combine Prelims)
– सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ (Maharashtra Non-Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच, सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

– महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदा/वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील.

– महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करीता ‘मराठी व इंग्रजी’ तसेच ‘सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी’ अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

– पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरीता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल.

एकूणच काय तर अगोदर 4 पूर्व परीक्षा होत होत्या आता MPSC च्या फक्त २ पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र या पूर्व परीक्षांच्या आधारावर निरनिराळ्या विभागांमध्ये आपल्या करू इच्छिणाऱ्या आणि प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत. राजपत्रित गट अ आणि ब च्या सर्व मुख्य परीक्षा या लेखी असणार आहेत. तर अराजपत्रित गट ब आणि क च्या सर्व मुख्य परीक्षा या MCQ मध्ये असणार आहेत.

उपरोक्त बदल सन २०२३ करीता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील व प्रस्तुत बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पध्दत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.

TAGGED: ,
Share This Article