MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी २०२३ या वर्षामध्ये होणार्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क संयुक्त पूर्व परीक्ष याचसोबत महाराष्ट्र तांत्रिकसेवा पूर्व परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व न्याय दंडाधिकारी यासह इतर परीक्षा कधी आणि या भरतीची जाहिरात कधी निघणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. MPSC च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा ०४ जून २०२३ या दिवशी तर राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० संवर्गासाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल तर ३० एप्रिल २०२३ रोजी परीक्षा पार पडेल.
Download : PDF 2022 MPSC Timetable
टीप :- (१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.
(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.