1. भारत २०१८ मध्ये जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था
*चालू वर्षाला निरोप देता देता शेवटच्या आठवड्यात अर्थविश्वातील दाेन मोठ्या बातम्या आल्या. एक म्हणजे सेन्सेक्स प्रथमच ३४,००० आणि निफ्टी १०,५०० अंकांच्या वर बंद झाला. देशातील वित्तीय संस्थांमुळे ही तेजी आली. या कंपन्यांनी जेवढे शेअर विकले त्यापेक्षा ५४४ कोटींचे अधिक खरेदी केले. परदेशी गुंतवणूकदारांनीही ४४ कोटींची विक्री केली. एवढ्यात लंडनच्या सीबीआरचा अहवालही आला. यानुसार, २०१८ मध्ये ब्रिटन व फ्रान्सला मागे टाकून भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होईल.
*सध्या भारत जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, मात्र २०१८ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्सला मागे सोडून भारत पाचव्या क्रमांकावर पोहोचेल. इतकेच नाही तर २०२७ मध्ये अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर राहील. म्हणजे तोपर्यंत भारत जपान आणि जर्मनीलाही मागे सोडेल. लंडनमधील सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर)ने मंगळवारी जारी केलेल्या एका अहवालात असे नमूद केले आहे. या अहवालानुसार २०३१ मध्ये अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल.
*पंधरा वर्षांत जगभरातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील तीन आशियातील देश असतील. यात चीन, भारत आणि जपानचा समावेश असेल. २०३१ मध्ये दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियादेखील टॉप १० देशांच्या यादीत येतील. तोपर्यंत इटली आणि कॅनडा या यादीमधून बाहेर जाईल. सध्या रशिया अकराव्या क्रमांकावर आहे. मात्र हा तेल व गॅसवर अवलंबून आहे. २०३२ मध्ये हा १७ व्या क्रमांकावर जाईल.
*नोटबंदी आणि जीएसटीसारख्या क्षणिक अडथळ्यानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेने तेजीने गती पकडली आहे. २०१८ मध्ये भारत फ्रान्स आणि इंग्लंडपेक्षाही मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. २०५० नंतर भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरण्याची शक्यता आहे, असे मत सीईबीआरचे डेप्युटी अध्यक्ष डग्लस मॅकविलियम्स यांनी व्यक्त केले आहे.
2. मोदी का गांव चित्रपट
*फिल्म मोदी काका का गांव अखेर शुक्रवारी देश भरातील चित्रपटगृहात रिलीज होत आहे. फिल्मचे आधी नाव मोदी का गांव असे ठेवण्यात आले होते, जे बदलून आता ‘मोदी काका का गांव’ केले आहे. या फिल्मला अनेक कारणांनी सेन्सारने प्रमाणपत्र देण्यात नकार दिला होता. अखेर 11 महिन्यांनतर ही फिल्म रिलीज होत आहे. फिल्म पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासांच्या मुद्यावर प्रेरित आहे. फिल्म निर्मात्याला फिल्म रिलीज करण्यासाठी याचे नाव बदलावे लागले. फिल्ममध्ये मुख्य भूमिका करणारे विकास महांतेंचा चेहरा पंतप्रधान मोदींशी मिळता-जुळता आहे. मुंबईत राहणारे महांते यांना पाहण्यासाठी संभांना सुद्धा गर्दी होते. फिल्मचे आधी नाव ‘मोदी का गांव’ ठेवले होते. त्यामुळे या फिल्मला सेन्सार बोर्डाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता.
3. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; कुडापासून निर्मित सभागृहात
भातशेतीच्या जमिनीवर आणि गवत व कडब्यापासून उभारलेल्या सभागृहात पहिल्या आसाम आंतरराष्ट्रीय ग्रामीण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महोत्सव अत्यंत दुर्गम अशा खेडेगावात आयोजित केला आहे. ग्रामीण जनतेला दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पाहण्यास मिळावेत या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे. आसाम आंतरराष्ट्रीय ग्रामीण चित्रपट महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. जागतिक दर्जाचे उत्कृष्ट चित्रपट फेस्युअल नामक गावात दाखवण्यात आले. हे गाव मेलेंग टी गार्डन परिसरात आहे. जोरहाट शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. २३ डिसेंबर रोजी या चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. आसाम फिल्म सोसायटीने (एएफएस) याचे आयोजन केले असून ४ दिवस विविध चित्रपटांचे प्रदर्शन येथे होईल. इटालियन, बांगलादेशी, सर्बियन, इराणी, मेक्सिकन, क्युबन चित्रपटांचे प्रदर्शन येथे झाले. याशिवाय आसामी, मणिपुरी, मल्याळम, मराठी, बंगाली या भारतीय भाषांतील चित्रपट येथे दाखवण्यात आल्याचे महोत्सवाचे दिग्दर्शक जयंता माधाब दत्ता यांनी सांगितले.
4. हॉर्वर्ड, स्टॅनफोर्डसारख्या बिझनेस स्कूलमध्ये मी-टू, नील-डाऊन अभियानावर धडे
वर्ष २०१७ मध्ये मी-टू, नील डाऊन, ट्रम्प-अॅमेझॉन ही तीन सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी अभियाने सर्वाधिक चर्चेत राहिली. या अभियानांचा जगातील तीन मोठ्या बिझनेस स्कूल्सनी अभ्यासक्रमात समावेश केला आहे. हॉर्वर्ड, स्टॅनफॉर्ड आणि वाँडरबिल्ट विद्यापीठातील व्यवस्थापन विषयातील विद्यार्थ्यांना या अभियानांबद्दल शिकवले जाणार आहे. अभियान आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर खुली चर्चाही केली जाणार आहे. वाँडरबिल्ट विद्यापीठाचे प्राध्यापक टीम वोगस म्हणाले, भविष्यात एखाद्या कंपनीत मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर जबाबदार व्यक्ती वादात अडकली तर सामना कसा करायचा याची माहिती व्हावी म्हणून वरील अभियानांच्या केस स्टडीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. या कार्यालयातील लैंगिक असमानता, लैंगिक छळ व अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित वाद टाळण्यासंबंधी शिकवण दिली जाणार आहे.
5. भारतीय संघ बनला नंबर 1
टीम इंडियाने श्रीलंकेला 2017 च्या शेवटच्या सिरीजमध्ये व्हाइट वॉश करत 3-0 ने मालिका जिंकली. ही टी-20 मालिका होती. यासोबतच भारत 2017 मध्ये सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनला आहे. भारताने या बाबतीत पाकिस्तानला पिछाडीवर टाकत मजल मारली आहे. टॉप 10 संघांच्या यादीत भारतीय संघ सध्या नंबर 1 च्या स्थानी आहे. मात्र, जगातील दिग्गज संघांपैकी एक ऑस्ट्रेलियाला यादीत स्थान मिळालेले नाही.
> ऑस्ट्रेलियाने या वर्षी फक्त 5 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोनमध्ये विजय मिळाला. टॉप 10 च्या लिस्टमध्ये किमान 3 सामने जिंकणाऱ्या संघांचा समावेश आहे.
> बांग्लादेश सुद्धा यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. बांग्लादेशने 7 टी-20 सामने खेळले तरीही विजय फक्त एकाच सामन्यात मिळाला आहे. इंग्लंड सुद्धा यादीत चक्क 10 व्या क्रमांकावर आहे.
> 2017 चे वर्ष टीम इंडियासाठी लकी ठरले आहे. भारताने एकूणच 53 सामने खेळले. त्यापैकी तब्बल 37 सामन्यांत विजय प्रस्थापित केला. तिन्ही फॉरमॅट्समध्ये सर्वाधिक विजयांच्या बाबतीत सुद्धा टीम इंडिया नंबर एक असून विनिंग टक्केवारी 70 इतकी राहिली आहे.
6. हिमाचल प्रदेशात जयराम ठाकूर यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
हिमाचल प्रदेशात आज जयराम ठाकूर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशिवाय 13 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हिआयपींना आणण्यासाठी 325 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे 13वे मुख्यमंत्री असतील. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रेमकुमार धूमल यांना मुख्यमंत्रीपदगाचा उमेदवार बनवले होते. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
7. पीओकेमध्ये घुसून तीन सैनिकांचा खात्मा, मेजर मोहरकर यांच्या हौतात्म्याचा बदला
गेल्या वर्षीच्या सर्जिकल स्ट्राइकच्या धर्तीवर कारवाई करत, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानच्या ३ सैनिकांना कंठस्नान घातले व त्यांची एक सीमाचौकीही उद्ध्वस्त केली. या कारवाईत पाकिस्तानचा आणखी एक सैनिक जखमी झाला. गेल्या शनिवारी काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, सीमेपलीकडून निष्कारण केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्यासह ४ सैनिकांना हौतात्म्य आले होते. पाकिस्तानच्या या दुष्कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने त्यांच्या हद्दीत घुसून ही जबाबी कारवाई केली.
8. मोपलवार पूर्वपदावर, समृद्धीची सूत्रे पुन्हा सांभाळणार
माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने क्लीन चिट दिल्यानंतर, ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य शासनाने मंगळवारी फेरनियुक्त केले. मोपलवार हे येत्या २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतरही विशेष पद देत, त्यांच्याकडे समृद्धी महामार्गाची जबाबदारी कायम ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोपलवार यांच्या कार्यकाळात भूसंपादनापासून इतर बाबींमध्ये प्रकल्पाला गती मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करीत असून, त्याची सूत्रे ही मोपलवार यांच्याकडे होती.