1. अत्याधुनिक सुपरसोनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
पृथ्वीच्या वातावरणात अत्यंत कमी उंचीवरून येणारे कोणतेही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हाणून पाडण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक सुपरसोनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची गुरुवारी ओडिशातील एका केंद्रावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या अद्ययावत हवाई संरक्षण (एएडी) सुपरसोनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चालू वर्षातील ही तिसरी चाचणी होती. चांदीपूरमधील एकीकृत केंद्राच्या परिसरातून लक्ष्यीत पृथ्वी क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. रडारवर क्षेपणास्त्राचे सिग्नल मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरातील अब्दुल कलाम बेटावरील इंटरसेप्टर क्षेपणास्त्र त्याच्या दिशेने झेपावले. त्यानंतर इंटरसेप्टरने लक्ष्याचा अचूक भेद करीत ते हवेतच नष्ट केल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या इंटरसेप्टरने पृथ्वीच्या वातावरणात ३० किलोमीटर उंचीच्या क्षेत्रातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यशस्वीपणे हाणून पाडले. बहुस्तरीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा हा एक भाग आहे. हे इंटरसेप्टर ७.५ मीटर लांबीचे ठोस रॉकेट प्रणोदन निर्देशित क्षेपणास्त्र असून हायटेक संगणकीय व इलेक्ट्रो-मॅकेनिकल ॲक्टीव्हेरयुक्त दिशानिर्देशन प्रणालीने ते सज्ज आहे. या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचे स्वत:चे मोबाईल लाँचर आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्राला लक्ष्य करण्यासाठी सुरक्षित डेटा लिंक, अत्याधुनिक रडार आणि इतर तांत्रिक वैशिष्ट्ये यात आहेत. चालू वर्षात करण्यात आलेली ही तिसरी सुपरसोनिक इंटरसेप्टर चाचणी आहे. यापूर्वी ११ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी इंटरसेप्टरच्या दोन चाचण्या करण्यात आल्या होता.
2. राज्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धां
राज्यातल्या शहरांमध्ये आता स्वच्छ वॉर्ड स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येणाऱ्या शहरांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येत्या १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन वॉर्डना बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन वॉर्डना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख तर ‘क’ व ‘ड’ वर्ग महानगरपालिकेतील वॉर्डना अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच ‘अ’ वर्ग नगर परिषदेसाठी अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख तर ‘ब’ वर्ग नगर परिषदांसाठी २० लाख, १५ लाख, १० लाख आणि ‘क’ वर्ग नगर परिषदांसाठी अनुक्रमे १५ लाख, १० लाख व ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
* अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना २० कोटी, तर ४ ते १० क्रमांकामध्ये आलेल्या शहरांना १५ कोटी देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागीय गुणानुक्रमात येणाऱ्यांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली असून यामध्ये पहिल्या ३ क्रमांकात येणाऱ्या शहरांना १५ कोटी, ४ ते १० क्रमांकामध्ये येणाऱ्यांना १० कोटी, तर ११ ते ५० क्रमांकामधील शहरांना ५ कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.
3. बुडीत कर्जांच्या देशांच्या यादीत भारत पाचवा
भारतातील बँकांचे सरासरी ९.८५ टक्के कर्ज बुडीत असल्याने भारत आता अशा पद्धतीच्या देशांमध्ये पाचव्या स्थानावर जाऊन बसला आहे. ज्या देशांची बुडीत कर्जे खूप जास्त आहेत अशा देशांमध्ये केवळ युरोपातील चार देश पहिल्या चार क्रमांकावर असून त्या खालोखाल पाचवा क्रमांक भारताचा येत आहे. या यादीत पोर्तुगाल, इटली, आयर्लंड, ग्रीस व स्पेन याचा क्रमांक येतो. यामध्ये स्पेनला पिग्ज असेच संबोधले जाते. केअर या पतमानांकन कंपनीने एका पाहणी अहवालात ही माहिती दिली आहे. भारताचे बुडीत कर्जाचे प्रमाण हे मोठे बुडीत कर्जांचे प्रमाण ज्या देशांचे आहे, त्यांच्या रांगेत नेणारे आहे. स्पेनचे बुडीत कर्जाचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. भारतातील बुडीत कर्जामध्ये पुनर्रचित मालमत्ता समाविष्ट नाही, जी मालमत्ता येथील बुडीत कर्जापेक्षा किमान २ टक्के जास्त आहे.
4. आरकॉम कंपनी रिलायन्स जिओच खरेदी करणार
अनिल अंबानी यांच्या तोट्यातील आरकॉम कंपनीची अखेर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओच खरेदी करणार आहे. त्यासंबंधीची दोन स्तरिय प्रक्रिया पूर्णही झाली आहे. तोट्यातील रिलायन्स कम्युनिकेशन्सची (आरकॉम) विक्री करण्याची घोषणा अनिल अंबानी यांनी मंगळवारी केली. या घोषणेच्या अवघ्या ४८ तासांतच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडकडून (आरजेआयएल) खरेदी केली जाईल, असे जाहीर करण्यात आले.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.