MPSC Current Affairs 30 December 2017
1) महाराष्ट्रातील ११६ शाळांना ‘टिंकरिंग’ लॅब
नीती आयोगाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११६ शाळांचा समावेश आहे. आयोगाच्या अटल इंनोव्हेशन मिशन अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. नीती आयोगाने ‘अटल टिंकरिंग लॅब’च्या माध्यमातून शाळेतील मुलांच्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९२८ शाळांचा समावेश करण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील ७५ शाळांचा समावेश होता. आता महाराष्ट्रातील १९१ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील ३८८ जिल्हे व ७९ स्मार्ट शहरांतील २ हजार ४३२ शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजवणे व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे, यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना २० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता ६ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
# महाराष्ट्रातील ११६ शाळांमध्ये सर्वाधिक ११ शाळा पुणे जिल्ह्यातील आहेत. यापाठोपाठ मुंबई १० आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १० शाळांचा समावेश आहे. याशिवाय अहमदनगर- ०४, अकोला -०१, अमरावती- ६, बीड- १, बुलडाणा- ४, चंद्रपूर- १, धुळे- २, गडचिरोली- २, गोंदिया- ७, हिंगोली- १, जळगाव- ३, जालना- १, कोल्हापूर- १०, लातूर- ४, मुंबई शहर- १०, मुंबई उपनगर- ४, नागपूर- ७, नांदेड- १, नंदुरबार- १, नाशिक- ५, उस्मानाबाद- २, पुणे- ११, रायगड- २, रत्नागिरी- २, सांगली- २, सातारा- ८, सोलापूर- २, ठाणे- ३, वर्धा- २, वाशीम- ४ आणि यवतमाळ- ३.
2) विश्वनाथन आनंदला विजेतेपद
पाच वेळेचा जागतिक विजेता विश्वनाथ आनंदने रियादमध्ये टायब्रेकरवर फेडोसीवला २-० ने पराभूत करत जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने स्पर्धेत जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला नवव्या फेरीत मात देत २०१३ मधील पराभवाचा वचपा काढला. या ४८ वर्षीय आनंद संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. त्याने ब्लादिमिर फेडोसीव व इयान नेपोम्नियाश्चिला मात दिली.
3) खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बढत्या पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मागास प्रवर्गांच्या बढत्यांतील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्यावरील स्थगिती कायम ठेवली आहे. मागासवर्गीयांना बढतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय आघाडी सरकारने २५ मे २००४ रोजी घेतला होता. ४ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरवताना आपल्याच निकालास १२ आठवड्यांची स्थगिती दिली होती. त्या दरम्यान, राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. कोणत्याही प्रवर्गात बढतीत आरक्षण देऊ नये, असे आदेश राज्य शासनाने २ नोव्हेंबर २०१७ रोजी काढले.
4) ३१ उपग्रहांचे होणार एकाच वेळी प्रक्षेपण
पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीसएलव्ही) या शक्तिशाली अग्निबाणाने येत्या १० जानेवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तब्बल ३१ उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही-सी ४० हा अग्निबाण वापरला जाईल. यात सोडल्या जाणा-या उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसॅट-२ मालिकेतील पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह हा मुख्य व सर्वात मोठा उपग्रह असेल. याखेरीज भारताचे दोन लघू व एक अतिलघू उपग्रहही या वेळी सोडले जातील. इतर २८ लघू उपग्रह फिनलॅण्ड व अमेरिकेसह इतर देशांचे असतील. गेल्या आॅगस्टमध्ये अशाच प्रकारच्या अग्निबाणाने आयआरएनएसएस-१ एच उपग्रह सोडण्याची मोहीम अपयशी ठरली होती.
5) सुशीलकुमारसह पाच पुरुष मल्लांचा गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सहभाग निश्चित
भारताला दोनवेळा ऑलिम्पिकपदकाचा मान मिळवून देणारा सुशीलकुमार आणि इतर पाच पुरुष मल्लांनी शुक्रवारी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला. या निवडीनंतर सुशीलबाबत वाद झाला. सुशीलच्याच ७४ किलो वजनी गटातील प्रवीण राणा आणि सुशीलच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. दरम्यान सुशीलसह (७४ किलो), राहुल आवारे (५७ किलो), बजरंग (६५ किलो), मौसम खत्री (९७ किलो) आणि सुमीत (१२५ किलो) या फ्रीस्टाइलमधील इतर मल्लांनी राष्ट्रकुलमधील सहभाग निश्चित केला. या सहा मल्लांना पुढील वर्षी बिशकेक, किरगिस्तान येथे रंगणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतही भाग घेता येईल.
I am computer engineer pass out in 2016. I want to prepare for block development officer . Will you please suggest me what should I do , from where should I start.