1) रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीमेसाठी मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका
रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी (नासकॉम) यांच्यामार्फत गेम बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्या विकासकाला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा जनजागृतीविषयक नासकॉम यांच्यामार्फत मोबाइल गेम बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी नासकॉमला करारापोटी व्यवस्थापन शुल्क म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनानंतर पहिल्या ३ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वित्तीय आणि प्रशासकीय विभागाने एकूण १२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. २०१४ साली २७ हजार ८५२ वरून रस्ते अपघातात २०१६ साली ७३ हजार ७८७ पर्यंत वाढ झाली. जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात ६३ हजार ०१७ नागरिकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला.
२) राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी
महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने धक्कादायक कामगिरी करत रेल्वेची ३२ वर्षांची विजयी परंपरा खंडित करताना जेतेपद पटकावले.
३) विकासदर ६.५ टक्क्यांवर येण्याचा केंद्र सरकारचा अंदाज
२०१७-१८ चा जीडीपी ६.५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात चांगली पिके आली असली तरी कृषी, उत्पादन क्षेत्रात घट होईल आणि बांधकाम व खनिज कर्म क्षेत्र सकारात्मक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी व नियोजन विभागाने शुक्रवारी हे अंदाज जारी केले. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशाचे ढोबळ राष्टÑीय उत्पादन २०१६-१७ च्या ७.१ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ६.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या एकूण उत्पादकतेचा निर्देशांक जीव्हीए द्वारे मांडला जातो. हा जीव्हीए २०१७-१८ मध्ये मागीलवर्षीच्या ६.६ टक्क्यांच्या तुलनेत ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र देशाचे दरडोई उत्पन्न ८२ हजार २६९ रुपयांच्या तुलनेत ८६ हजार ६६० रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजांनुसार २०१८-१९ मध्ये जीडीपी आणखी मजबूत होईल. तो ७ टक्क्यांचा टप्पा पार करू शकेल, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.
४) 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन टप्प्यात यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर 5 मार्च ते 6 एप्रिल या काळात दुसरा टप्पात सुरु होणार आहे. तर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. तसेच, याचदिवशी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येईल, असे अनंतकुमार यांनी सांगितले. दरम्यान, ब्रिटिश परंपरेनुसार देशात आजवर फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, या परंपरेला छेद देऊन अर्थमंत्री अरुण जेटली येत्या एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
५) इंटेलचे प्रोसेसर असणाऱ्या जगभरातील सर्व संगणक, मोबाइलवर मेल्टडाऊन, स्पेक्टर बग हल्ल्याचा धोका
संगणक, फोन प्रोसेसर आणि चिप निर्मिती करणाऱ्या इंटेल कंपनीची सुरक्षितता सध्या धोक्यात आली आहे. कमकुवत सिक्युरिटी पॅर्टनमुळे इंटेल प्रोसेसर असणारे जगभरातील सर्व संगणक आणि मोबाइलला मेल्टडाऊन आणि स्पेक्टर बगचा धोका आहे. विंडोज, लायनक्स आणि अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित सर्व डिव्हाइसवर याचा परिणाम होईल. या डिव्हाइसमधील सेव्ह असलेले पासवर्ड आणि सुरक्षित डाटा हॅक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायबर सुरक्षा मानक निश्चित करणाऱ्या ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरच्या मते, मागील १० वर्षांत बनलेल्या ६० टक्के डिव्हाइसवर बगचा हल्ला झाला. बगमुळे इंटेल प्रोसेसर असणाऱ्या डिव्हाइसची गती ३० टक्के कमी झाली आहे. इंटेलशिवाय एएमडी, एआरएम प्रोसेसरवरही हल्ला झाला.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.