MPSC ची २१ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ४ जानेवारी रोजी होणार होणार आहे. याबाबत अधिकृत परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा रविवार २१ डिसेंबरला होणार होती. त्याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आयोगाकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतु पावसामुळे २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही परीक्षा ४ जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर कऱण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी सहायक कक्ष अधिकारी- ०३ पदे, राज्य कर निरीक्षक-२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक – ३९२ पदे यासाठी पूर्व परीक्षा होत आहे.











