सोलापूरच्या गवळी वस्तीतील एका गरीब कुटुंबातून आलेल्या दोन बहिणींनी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळविले आहे. संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोन सख्या बहिणींनी त्यांच्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात, अहोरात्र अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
ज्योतीराम भोजने हे गॅरेज चालक असून, त्यांचे कुटुंब अत्यंत दारिद्र्याच्या परिस्थितीत जगत होते. ज्योतीराम यांचे शिक्षण पाचवीपर्यंतच झाले होते आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. मात्र, त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रात जम बसवले आणि कुटुंबाची सांभाळण्याचा प्रयत्न केला. संजीवनी आणि सरोजिनी या दोन मुलींनी बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि 2018 पासून एमपीएससी परीक्षा देण्यास सुरुवात केली.
कोरोना महामारीच्या काळात, तीन वर्षे परीक्षा होऊ न शकल्यामुळे दोन्ही बहिणी खचून गेल्या होत्या, परंतु त्यांनी आई-वडिलांना त्याची जाणीव करून दिली नाही. संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि त्यांनी एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवला. मंगळवारी (११ फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजता एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि भोजने कुटुंबात एकच आनंदोत्सव साजरा झाला.
संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सात वर्षात एकूण सहा एमपीएससीच्या मेन्स परीक्षा दिल्या, परंतु पॉईंटमुळे मागे पडावे लागत होते. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर, बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री त्यांना गोड बातमी मिळाली. आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. संजीवनी आणि सरोजिनी या दोघींना मंत्रालय महसूल विभागात क्लार्क म्हणून पोस्ट मिळणार आहे.
“आई, वडील आणि भावाने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे” संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले. त्यांच्या यशाचे संपूर्ण सोलापुरात कौतुक होत आहे. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो तरी गरिबी विसरणार नसल्याचे संजीवनी ज्योतीराम भोजने हिने सांगितले.