पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळे पूजा गायकवाड-चौगुले झाली पीएसआय !
ग्रामीण भागातील मुलींची अजूनही लवकर लग्न होतात. त्यामुळे त्यांचे शिक्षण व स्वप्न अपुरे राहते. पण पूजा गायकवाड-चौगुले हिच्या पतीने तिची हुशारी हेरली आणि ‘फक्त वर्दी मिळव’ एवढाच हट्ट धरून सावलीसारखा हरघडीला सोबत उभा राहिला. पूजा ही मूळची बारामती येथील वाणेवाडीची लेक. वाघळवाडीतून वाणेवाडीत स्थलांतरित झालेल्या माणिक व सुमित्रा गायकवाड या दांपत्याची मुलगी.
वाघळवाडी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, सोमेश्वर विद्यालयात माध्यमिक; तर न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीत उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. बारावीनंतर शारदानगरला पोलिस अकादमीत वर्षभर अभ्यास केलेलाच होता. पती राहुल याच्या आग्रहाने सन २०१९मध्ये करंजेपूलच्या विवेकानंद अभ्यासिकेत जाऊन अभ्यास सुरू केला. तिचे पती हे फार शिकलेले नाहीत. कुठेही काम करून चार पैसे उभे करतो. मात्र, ‘वर्दीला लय किंमत असते, रुबाब असतो. आपल्या खानदानात कोणी अधिकारी नाही. त्यामुळे अधिकारीच बन,’ असा हट्ट धरला. अभ्यासिकेत ने-आण, आर्थिक उभारणी, मैदानी सराव, आहाराची सोय हे त्याने न थकता केले. अर्ज भरण्यापासून मुलाखतीपर्यंत सावलीसारखा सोबत राहिले.
याला सर्व प्रयत्नांना यश आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२२च्या परीक्षेत तिने २५६.५० गुण मिळवून अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिल्या दहात स्थान पटकावले आहे. वाणेवाडीत पीएसआय झालेली ती पहिली महिला ठरली आहे.