आई -वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मेहनत केली ; अक्षय झाला प्रशासकीय अधिकारी!
MPSC Success Story : आपल्या करिअरच्या टप्यावर आई -वडिलांची साथ असेल तर प्रगतीचे मार्ग अधिक मोकळे होतात. असेच, ग्रामीण भागातील उक्कडगाव सारख्या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलीस उपनिरीक्षक झाल्याने अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपुत्र अक्षय महादेव महाडिक याची राज्य उत्पादन शुल्क विभागात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवला आहे.त्याचे शालेय शिक्षण हे उक्कडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण श्री मुंजोबा विद्यालय उक्कडगाव यथे झाले. पुढे, महाविद्यालयीन शिक्षण हे विद्याधाम प्रश्नाला शिरूर येथे झाले. लोणी प्रवरा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्याने प्राप्त केली.पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
अक्षय लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगा… यात त्याला घरच्यांची व गुरूवर्याची साथ लाभली. त्यामुळे त्याने आई वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यासाठी त्याने मैदानी सराव देखील केला. म्हणूनच अक्षयची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.हा संपूर्ण गावासाठी अभिमान आहे.