MPSC Success Story : आपले आई – वडील दिवसरात्र राबून शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. त्यांना एक ना एक दिवस आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण अनुभवायला देणार…हा ध्यास उराशी बाळगून ज्ञानेश्वरने मेहनत घेतली. तो शिक्षण घेत असताना त्याचे वडील गवंडी काम करून तर आईने कपडे शिवून त्याच्या शिक्षणाला मदत केली. आपला मुलगा शिकला पाहिजे हेच त्यांच्यापुढे ध्येय होते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील अत्यंत गरीब कुटुंबातील ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे हा सुपुत्र….त्याचे प्राथमिक शिक्षण गुळवंची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत झाले. बारावी वाणिज्य शाखेतून हरिभाई देवकरण प्रशालेत झाले.
पंढरपूर येथील द. ह. कवठेकरमध्ये डी. एड्. पूर्ण केले. त्याचवेळी त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबई पोलिस दलात भरती झाला. तेवढ्यावरच न थांबता त्याने अभ्यासात सातत्य ठेवत एमपीएससी तयारी सुरू ठेवली. त्यांच्या कष्टाची जाण ठेऊन सातत्याने अभ्यास करून ज्ञानेश्वरने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकार झाले.