MPSC Success Story : अवघी दीड एकरची शेती…आई – वडील मजूर कामगार म्हणून राबायचे आणि घर खर्च काढायचे. पत्नी, दोन मुली, एक मुलगा अशा पाच जणांचं कुटुंब. शेतीत भागत नसल्याने रमेश यांनी गावातील रेशन दुकानदार संपत पाटील गौरकर यांच्याकडे काम केले. त्यातून धान्याचा प्रश्न मिटायचा आणि चार पैसेही मिळायचे…वेळप्रसंगी आईने हौसेला मुरड घालत दागिने मोडून शिक्षणासाठी पैसे केले. मुलांना उच्च शिक्षित केले. मुलाने देखील जाणीव ठेवली आणि दिवसरात्र मेहनत घेतली.
ही गोष्ट आहे सूरज रमेश कोडापे असे या शेतकरी पुत्राची… MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक २०२१ परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून त्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सुरजचे शालेय प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे चामोर्शी, भेंडाळा येथील शाळेत शिक्षण घेतले. नंतर जवाहर नवोदय विद्यालय घोट येथून बारावी पूर्ण केली. भूगोल विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवल्याने सुरजला तत्कालीन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवनात पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १२० विद्यार्थ्यांशी हितगुज साधले होते. यात सुरजचाही समावेश होता. नंतर त्याने पुण्यातून राज्यशास्त्र विषयातून पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेत मास्टर पदवीही मिळवली. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
पुण्यात शिकवणीसाठी पैसे नव्हते, तेव्हा आईने कर्णफुले विकली आणि पैशांची जुळवाजुळव केली. २०२१ मध्ये उपनिरीक्षक पदाच्या ३७६ जागांसाठी जाहिरात निघाली. पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये तर मुख्य परीक्षा जुलै २०२२ मध्ये पार पडली. नोव्हेंबर २०२३ मध्ये शारीरिक चाचणी झाली. मार्च २०२४ मध्ये मुलाखत पार पडली. मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे अंतिम निकाल लागण्यासाठी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागली. अखेर १० एप्रिल रोजी शेतकऱ्याचा मुलगा सूरज फौजदार झाला.