लहानपणीच आई-वडिलांचे छायाछत्र हरपले; पण पोराने करून दाखवले, सूरज झाला PSI
MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की यश – अपयश हे आलंच. सूरज पाडळेचा प्रवास हा खडतर होता. लहानपणीच आई – वडिलांचे छायाछत्र हरपले. आजीने सांभाळ केला.सूरजचे प्राथमिक शिक्षण रामवाडी, वालूथ, येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण हुमगाव येथे झाले.
महाविद्यालय बी.एस.सी पर्यंतचे शिक्षण किसन विर महाविद्यालय वाई येथे घेतले. पुढील एम. एस.सी पुणे विद्यापीठातून केली आहे. हे करीत असताना त्याला स्पर्धा परीक्षांची ओढ लागली होती. त्याकरिता घरीच राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास झाला. सूरजच्या लहान भावाने मोठ्या भावाची भूमिका निभावत खाजगी नोकरी पत्कारून घराची जबाबदारी अंगावर घेतल्याने सूरजचा अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला.
सूरजने सन २०२२ मध्ये पी. एस आय. पदाकरीता लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा दिली होती. या स्पर्धा परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून सूरजच्या खडतर परिश्रमाचे चीज झाले. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे.