आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर त्यासाठी मेहनत ही घेतलीच पाहिजे.तसेच महेशने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व पूर्णवेळ स्वतःला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात झोकून दिले. तो यशस्वी देखील झाला. महेश हा माण तालुक्यातील जाशीतील इथला लेक…दिगंबर खाडे व प्रमिला खाडे या ऊसतोड कामगार… त्यामुळे त्याने लहानपणापासून कष्ट पाहिले होते. त्या कष्टाची जाणीव होती.
त्यासाठी त्याने आपल्याला परिस्थिती बदलायचे असेल तर अधिकारी व्हावे लागेल ही चिकाटी ठेवली.महेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जाशी गावातच झाले. उच्च माध्यमिक शिक्षण दहिवडी कॉलेज दहिवडी येथे झाले. शैक्षणिक कर्जाच्या साह्याने टेक्स्टाईल अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्याने एका खाजगी कंपनीत दीड वर्षे नोकरी केली. कारण, यात त्याला समाधान मिळत नव्हते. नंतर त्याने स्पर्धा परीक्षेची खूप तयारी केली. बेताची परिस्थिती असूनही नोकरी सोडणे अवघड होते. तरीही त्याला ताई व दाजींनी पाठबळ दिला. त्याच्या सहकाऱ्यांनी कायम प्रोत्साहित केले.
पण असे असूनही त्याला यात अपयश आले. यश एवढे सहजसाध्य नव्हते. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत दोनवेळा त्याला अपयशाला सामोरे जावे लागले; चिकाटी न हरता त्याने पुन्हा नेटाने अभ्यास केला. अखेर, लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या निकालात राज्यात १८ वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.