MPSC PSI Success Story : आपण सर्व परिस्थितीवर मात करून पुढे गेले पाहिजे. त्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. महेश थोरवेला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं आहे, हे मनाशी ठाम बांधून पुणे येथे जाऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. महेशच्या या अहोरात्र अभ्यासामुळे त्याला पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) हे पद मिळाले.
महेशचे शालेय शिक्षण वाईमध्ये झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण वाय.सी कॉलेज सातारा येथे झाले. पुढे त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली.या शिक्षणाच्या प्रवासात असताना महेश अकरावीला असताना पितृछत्र हरपले. मात्र या अडचणीच्या काळात त्यांच्या आईने त्याला आधार दिला. त्याला नुसतं घडवले नाहीतर अधिकारी होण्यासाठी सक्षम बनवले. त्याने देखील आपली नोकरी सांभाळत मिळेल त्या वेळेस ग्रंथालयामध्ये अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवले. त्यांना अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये संधी काही गुणांसाठी हुकवत होती मात्र निराश न होता त्याचे प्रयत्न सातत्याने चालू होते.
पण नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल लागला.महेश शामराव थोरवे यांनी उज्वल यश संपादन केले आहे. अपयश आले तरी न डगमगता जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य व प्रामाणिकपणा जोरावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे.