MPSC PSI Success Story : एका अतिसाधारण कुटुंबात जन्मलेला…घरची परिस्थिती इतकी बेताची की आई-वडील रोजंदारीवर कामाला गेले तर घर चालायचं….संपूर्ण बालपण मुंबईतील झोपडपट्टीत गेलन…असे असताना देखील आपल्याला पोलिस व्हायचं आहे. वर्दी ही हवीच या इच्छेपोटी मेहनतीच्या जोरावर सागर अंगद शिंदे (Sagar Shinde) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच पीएसआय या परीक्षेत उत्तीर्ण झाला.
सागरचे शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या सरकारी शाळेत झाले तर सागरने अकरावीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला, अकरावी आणि बारावीत पास झाला. पण त्याला आता वाटू लागलं होतं की पोलीस व्हायचं तर कला शाखेत जायला हवं, म्हणून त्यानं तिकडे कला शाखेत पदवीसाठी प्रवेश घेतला.
हे पदवीचे तीन वर्षे शिक्षण घेत असताना त्याने बऱ्याच ठिकाणी नोकरीही केली. कधी चहा विकला तर कधी हमालकी केली….काम करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व्हायचा नाही म्हणून आईने त्याला फक्त अभ्यास कर असा पाठिंबा दिला. अभ्यासिकेत दिवस रात्र पुस्तक आणि अभ्यास यांत रमलेल्या मुलांच्या कंपूत तो आता सामील झाला. पण त्याला स्वतःशी लढायचं होतं. एकतर पहिल्यांदा घरच्यांना सोडून तो लांब आला होता. अभ्यासिकेतल्या मित्रांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जोरदार तयारी सुरू केली.
सगळ्यांबरोबरीने सागरने रोज १२-१२ तास अभ्यास केला. या तयारीच्या काळात त्याला अपयश देखील आले पण तो धीराने सामोरे गेला.त्याला पुण्यात येऊनही चार वर्षे झाली होती. त्यानं पीएसआयच्या पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्या. आता उरली होती तिसऱ्या टप्यातली शारीरिक क्षमता चाचणी. त्याला मैदानी व्यायामाची सवय नव्हती त्यामुळे त्याला सरावाच्या दरम्यान दुखापत व जखमेला सामोरे जावे लागले. या सगळ्या सागरच्या प्रयत्नांना यश आले. तो ही मैदानी चाचणी देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. आता तो पीएसआय आहे. या प्रवासात त्याला लोकांनी पदोपदी हिणावले पण आई – वडिलांनी खंबीरपणे साथ दिली, त्याने देखील त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली म्हणून तो आज या पदावर आहे.