MPSC Success Story : लहानपणापासून जिद्दी व हुशार असलेल्या सोनालीने आयुष्यात शिकून अधिकारी व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगले होते. तिच्या आई – वडिलांचे देखील स्वप्न होते की तिने मोठे होऊन अधिकारी पद मिळवावे. पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. असे असले तरी तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
सोनाली सोनवणे ही मूळची बागलाण तालुक्यातील तिळवणची लेक.अल्पभूधारक शेतकरी रमेश सोनवणे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचा पाच मुली व दोन मुले असा मोठा परिवार आहे. मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट केले. मुलांनी देखील परिस्थितीची जाणीव ठेवली. सोनालीने गावातीलच शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले . इतकेच नाहीतर दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.
दहावीनंतर बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावीत उत्तम गुण मिळवून कॉम्पुटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान तिने स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. पण आर्थिक परिस्थिती बेताची होती म्हणून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नाशिक येथे नोकरीसह परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. नोकरी आणि अभ्यास ही तशी तारेवरची कसरत होती.पण तिने अभ्यासात सातत्य ठेवले. पण कोरोनाच्या दरम्यान देखील घरून अभ्यास चालू ठेवला. आईला कोरोना झाल्यामुळे व पहिल्याच परीक्षेत दोन मार्काने अपयश आल्याने मानसिक खच्चीकरण होत होते.तिने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरूवात करून स्व-बळावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. आपले स्वप्न करण्याचा ठाम निश्चय केला की स्वप्न नक्कीच पूर्ण होतात.