MPSC PSI Success Story जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आपल्याजवळ जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत करण्याची तयारी असावी लागते. विकासने अधिकारी व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्याने शहरात राहून फळे विकली. खानावळ चालवून खर्च भागविला. हे करताना स्पर्धा परीक्षा देत राहिला.
आता अधिकारी झाल्याशिवाय गावाकडे फिरकायचे नाही, अशी खूणगाठ मनात बांधली. घरच्यांना आठवण आल्यावर विकासला भेटण्यासाठी आळेफाटा येथे जायचे. त्याने देखील जिद्दीने स्वप्न पूर्ण केले. विकास मोरे हा मूळचा संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ या गावातील लेक. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन विकासही बाहेर पडला. पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. खर्चाला पैसे हवे होते. प्रारंभी फळांचे दुकान लावले. त्याला जोड म्हणून जेवणाचे डबे तयार करून देऊ लागला. अशी सगळी जबाबदारी निभावताना अभ्यास सुरूच होता.
शेतकरी कुटुंबात विकासचा जन्म झाला. या भागात दुष्काळी स्थिती. त्यावर मात करण्यासाठी असे एक ना अनेक प्रयत्न केले. तो कामे उरकल्यावर वाचनालयात जायचा. काहीही झालं तरी मी पोलिस उपनिरीक्षक होणारच, अशी खूणगाठच मनाशी बांधली होती. यात त्याला दोनदा अपयश आले, नंतर मात्र त्याने यशाला गवसणी घातली. अखेर, पोलिस उपनिरीक्षक झाला.













