MPSC परीक्षेत शेतकऱ्याच्या मुलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ चा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या परीक्षेत शेतकऱ्याचा मुलगा विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर राज्यातून पहिला आला आहे. राज्यात धनंजय बांगर (608) हा दुसरा आला. तर सौरभ गावंदे (608) याने तिसरा क्रमांक मिळवला. गणेश दत्तात्रय दिघे (605) चौथा तर शुभम गणपती पाटील (603) आला.
उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील 623 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. 18 जानेवारी 2023 गुरुवारी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला. या मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या निकालात यंदा कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक पाटील यांनी 622 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. तर धनंजय पाटील 608 गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला 570 गुण मिळाले. विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्रसन महाविद्यालयात झाले. संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या गावात जल्लोष करण्यात आला.
आता होणार पसंतीक्रमाची प्रक्रिया
एमपीएससी परीक्षेचा निकाल आल्यानंतर आता पसंतीक्रमाची प्रक्रिया सुरु होणार आहे. २२ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल.