अधिकारी बनूनच गाव गाठणार, अन् जिद्दीने विकासचे स्वप्न झालं पूर्ण, बनला अधिकारी
आपली जिद्दच आपल्या जगण्याची प्रेरणा बनते.नांदूर खंदरमाळ (ता. संगमनेर) येथील विकास मोरे या तरुणाची ही गोष्ट. त्याने जिद्द आणि चिकाटी उराशी बांधून शिक्षणाची कास धरली. तो अधिकारी व्हावे, असे वडिलांचेही स्वप्न होते.
गावात दुष्काळी स्थिती. त्यावर मात करण्यासाठी अनेक जण नोकरी व व्यवसायाठी बाहेर पडतात. असेच अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन विकासही बाहेर पडला. पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या.. आपले राहते घर सोडले आणि शहरात राहून फळे विकली. खानावळ चालवून खर्च भागविला.त्याला जोड म्हणून जेवणाचे डबे तयार करून देऊ लागला. अशी सगळी जबाबदारी निभावताना अभ्यास सुरूच होता.
कामे उरकल्यावर तो वाचनालयात जायचा.त्याला वडील मनाजी, आई सुरेखा, पत्नी चैताली, भाऊ शरद यांची मोलाची साथ लाभली. त्याने अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्याला दोनदा अपयश आले. पुन्हा त्याने जोमाने अभ्यास केला.केवळ तीन वर्षांत तो अधिकारी झाला.जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आपल्याजवळ जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत करण्याची तयारी असावी लागते. हेच त्याने दाखवून दिले.