⁠  ⁠

लग्न लवकर झाले पण संसारगाडा सांभाळत, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अनिता झाली पोलिस अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story ग्रामीण भागातील वातावरणात अजूनही लवकर लग्न होताना दिसते. पण मुलींना लग्नानंतर देखील शिक्षणासाठी आणि विविध परीक्षा, नोकरीसाठी प्रोत्साहित केले तर मुली नक्कीच गगनभरारी घेऊ शकतात. हेच अनिताने दाखवून दिले आहे.

अनिता ही मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील वाळेण या गावची लेक. अनिताचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोळवण या शाळेत झाले. तिने पिरंगुटला बारावीचे शिक्षण घेतले. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, मुलांना उच्च शिक्षित करणे देखील त्यांना अशक्य होते. तिच्या बारावीनंतर कुटुंबियांनी लग्न लावून दिले.आता आपले शिक्षण थांबणार या मानसिकतेत अनिताने संसाराचा गाडा हाकायला सुरूवात केली.लगेचच लग्न संसाराचा गाडा बाळाला जन्म त्यातूनच चूल आणि मूल यातच अनिता रमून गेली. पण अनिताची शिक्षणासाठीची ओढ आणि अधिकारी होण्याचे स्वप्न, हुशारी पतीने हेरले.

पती अशोक हुलावळे यांना तिच्यातील शिक्षणाच्या जिद्दीची जाण झाली होती. त्यांनी अनिताला शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले.घरकाम संभाळून अनिताने मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने पदवी पूर्ण केली. पण पती अशोक हुलावळे ह्यांना त्यांच्या बायकोला सरकारी अधिकारी झालेले पाहायचे होते.अशोक यांची घोटावाडे फाटा येथे जीम असून ते उत्तम प्रशिक्षक आहेत. त्यांच्या या अनुभवाचा अनिताला मोठा लाभ झाला.डाएटपासून ते शारीरिक कसरतीपर्यंत अशोक हुलावळे यांनी पूर्णपणे तयारी करून घेतली.मग अनिताने मात्र मागे वळून पाहिले नाही. पदवी परीक्षेनंतर अनिताने सरकारी अधिकारी बनण्याचे ध्येय ठरवून घेतले.

याच प्रयत्नांच्या जोरावर अनिताने अशोक हुलावळे यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व व मुख्य परीक्षा पास केली.इतकेच नाहीतर अनिता हुलावळे मुलींमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.पत्नी, सून आणि आई या नात्यांना न्याय देतानाच कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे संघर्षातून अनिता पोलीस अधिकारी बनली.

Share This Article