आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले! अंजना बनसोडे झाली वनक्षेत्रपाल अधिकारी..
MPSC Success Story : सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली….अगदी कोणताही वारसा नसताना देखील आई – वडिलांनी तिला उच्च शिक्षित केले. वेळप्रसंगी आई- वडिलांनी आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करून मुलांना घडवले आणि चांगले शिकवले. अंजना ही मूळची फुलचिंचोली या गावची लेक. तिचे शालेय शिक्षण हे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. लहानपणापासून तिला अभ्यासाची आवड होती.
त्यामुळे तिने शालेय स्तरापासूनच नावलौकिक केले. चौथी शिष्यवृत्ती, सातवी शिष्यवृत्ती आणि नवोदय अशा सगळ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यामुळे तिचे पुढील शिक्षण हे नवोदय विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर तिने बी.टेक पूर्ण केले. या शैक्षणिक प्रवासाच्या दरम्यान तिला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. त्यानुसार तिने जिद्दीने अभ्यास केला. गतवर्षी तिची सातारा जिल्ह्यात तलाठी या पदासाठी देखील निवड झाली. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वनक्षेत्रपाल अधिकारी या पदासाठी देखील निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले तर त्या नक्कीच समाजात आणि विविध स्तरावर नाव कमवू शकतात हे अंजनाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.