आंतरराष्ट्रीय धावपटू झाली उपजिल्हाधिकारी; दुर्गा देवरेचा प्रेरणादायी प्रवास…
MPSC Success Story खेळ आणि अभ्यास यांची सांगड घातली तरी आपण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतो. हे दुर्गा देवरे हिने दाखवून दिले आहे. तिने शाळेत असताना वयाच्या आठव्या वर्षांपासून विविध खेळात सहभागी होण्यास सुरूवात केली. त्यात तिला यश मिळत गेले. वडील आणि भाऊ दोघेही स्पोर्ट्समन असल्याने तिला घरातूनच बाळकडू मिळत गेले आणि ती धावण्याच्या स्पर्धेत एक एक शिखर पार करत गेली.
तिला आता पर्यंत ४ आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय तसेच ४० हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. हीच एकाग्रता अभ्यासात देखील वापरून तिने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. दुर्गा देवरे हिची एमपीएससी परिक्षेत उपजिल्हाधिकारी निवड झाली आहे.तरूण-तरूणींना प्रेरणादायी ठरेल असा आंतराराष्ट्रीय धावपटू ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास राहिला आहे.
दुर्गा ही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वाझगावची रहिवासी आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तिचे कुटूंब नाशिकमध्ये स्थायिक असल्यामुळे दुर्गाचे संपूर्ण शिक्षण हे नाशिक शहरात झाले आहे.
लहानपणापासून दुर्गा हुशार होती. तिला दहावीत ९२ टक्के मिळाले होते. पुढे तिने राज्यशास्त्र या विषयात एम.ए पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. प्रशासकीय सेवेत कामकाज करण्याचे तिचे स्वप्न होते यासाठी तिने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळवले. खेळाडू असल्याने एका जागी सात- आठ तास बसून अभ्यास करणे तिच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. पण स्वतः विविध विषयांचे नोट्स काढून तिने नियोजनबद्ध अभ्यास केला. त्यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामध्ये आई-वडील आणि मोठ्या भावाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.