शेतकऱ्याच्या मुलाने करून दाखवले; किशोर पवार झाला पोलिस उपनिरीक्षक
MPSC Success Story : किशोर हा लहानपणापासून शेतकरी कुटुंबात लहानाचा मोठा झाला. किशोर तसा अभ्यासात हुशार त्यामुळे भाऊ विजय पवार सीआयएसएफ, हनुमान अरुण पवार बीएसएफमध्ये कार्यरत असून, देशसेवा करीत आहेत. दोघा भावंडांचे प्रोत्साहन व डोळ्यासमोर आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव, गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाले.
किशोरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अंबोडे, माध्यमिक, उच्च माध्यमिक पंडित नेहरू सह शेती विद्यामंदिर, नवलनगर व क्रांतिवीर नवलभाऊ महाविद्यालयात पदवीधरपर्यंतचे शिक्षण झाले. आई-वडील शेती करीत असल्यामुळे सर्व भावंडे त्यांना मदत करीत होती. नोकरी करून स्पर्धा परीक्षा, मैदानी व मुलाखतीची तयारी करत होता.चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत थोड्या फरकाने अपयश मिळत होते.
शेवटी पाच महिन्यांपूर्वी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात वर्ग ४ ची डेंटल असिस्टंट म्हणून नोकरी स्वीकारली होती.२०१७ पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळाला. २०२० मुख्य परीक्षेत अपयश, २०२१ ला पूर्वपरीक्षेत अपयश, २०२२ च्या परीक्षेत यश मिळाले व पोलिस उपनिरीक्षकपदाचे स्वप्न साकार झाले.
अंबोडा येथील शेतकरी अरुण पवार यांचा मुलगा किशोर पवार पोलिस उपनिरीक्षक झाल्याने परिसरात त्याचे कौतुक करण्यात येत आहे. किशोर आता अनेकांसाठी प्रेरणादायी बनला आहे.