MPSC Success Story : ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांसाठी अजूनही मुबलक सोयीसुविधा नसतात. पण त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले तर ते देखील उंच भरारी घेऊ शकतात. शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या जयश्री रमेश कातकडे हिने आपल्या हुशारीतून हे दाखवून दिले आहे. जयश्री ही शेवगाव तालुक्यातील निमगावाची लेक. तिचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण झाले. नंतर उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण शेवगाव येथे पूर्ण केले. सिव्हील इंजिनिअरची पदवी काष्टी येथे संपादित करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
जिद्द, कष्ट आणि सातत्य या तीन गोष्टी असल्या की यश हमखास मिळते. तिने हे सूत्र लक्षात ठेवले. रोज सातत्याने अभ्यास करायची. सलग ३ वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.मध्यंतरी त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक अडचणीतून जावे लागले. कोरोना महामारीमध्ये वडील आणि चुलते यांचे छत्र हरपले. पण दुःखाला कवटाळून न बसता परिस्थितीचे दोन हात करत कुटुंबियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासात थोडाही खंड पडू दिला नाही.
ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणात अनेक अडचणी असून देखील घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तिने अभ्यासात गती मिळवली. अनेक अडचणींचा सामना करत जयश्रीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतलेल्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश मिळवले. सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावर निवड झाल्याने संपूर्ण कुटुंब व गाव आनंदात आहेत.