महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेणाऱ्या येणाऱ्या परीक्षांसाठी तरुण-तरुणी अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, यात यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असं नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे कैलास पावरा या तरुणाने दाखवून दिलं आहे. कठोर मेहनतीच्या बळावर MPSC च्या परीक्षेत यश संपादन करून वयाच्या 24 व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातून सरदार सरोवर प्रकल्पामुळे कैलास पावरा यांचा परिवार विस्थापित झाला 14 वर्षानंतर ही सरकारने आणि प्रशासनाने त्यांचे पुनर्वसन केले नाही पुनर्वसन वसाहतीत राहणाऱ्या पावरा परिवाराकडे ना शेतजमीन ना हक्काचे घर अशी परिस्थिती असतानाही कैलासने नर्मदा अभियानाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले पुढे पदवीधर झाला. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तो पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. परिस्थितीशी दोन हात करत असताना एकीकडे पुनर्वसनासाठी प्रशासनाशी संघर्ष तर दुसरीकडे आहे त्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या दुहेरी संघर्षात कैलास यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कैलासचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प.शाळा रोझवा पुनर्वसन येथे तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे येथे झाले. त्यानंतर जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेच्या पदवीचे शिक्षण घेतले. कुटुंबाला हातभार सोबतच परीक्षेची तयारी पदवीच्या तृतीय वर्षाला असताना कैलासने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली.
सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये मैदानी चाचणी तर मार्च 2023 मध्ये मुलाखत पार पडली. या परीक्षेचा अंतिम निकाल 4 जुलै जाहीर झाला. यात कैलासने यश संपादन करून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. गावखेड्यातील या युवकाने मैदानी चाचणीतही शंभरपैकी 93 गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. कैलासने कुटुंबाला आधार देण्यासाठी आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात मोलमजुरी केली आहे. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी केली.